ई-निविदेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक पालिका सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना सकस आहारात चपाती उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटदार सापडला असून आवश्यक ते सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या कंत्राटदारामार्फत रुग्णालयातील रुग्णांना दुपार आणि रात्रीच्या जेवणात प्रत्येकी चार चपात्या मिळणार आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना दुपार आणि रात्री मोफत आहार देण्यात येतो. रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येकी चार चपात्या देण्यात येत होत्या. चपातीचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत १२ एप्रिल २०१९ रोजी संपुष्टात आली होती. त्यामुळे प्रशासनाने तीन वर्षे रुग्णालयाला चपातीचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात रुग्णांना पोषक आहार म्हणून चपाती मिळावी म्हणून दरपत्रिका मागवून चपातीचा पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर प्रशासनाने चपातीसाठी पुन्हा ई-निविदा मागविल्या.

रुग्णालयातील १५०० आंतररुग्णांना दररोज दुपारी व संध्याकाळी प्रत्येकी चार याप्रमाणे चपाती पुरविण्यासाठी एक कोटी ६५ लाख ७१ हजार ५२० रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले होते. प्रति चपाती २ रुपये ५२ पैसे असा दर त्यात निश्चित करण्यात आला होता. प्रशासनाने पुन्हा मागविलेल्या ई-निविदेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यास मुदतवाढ द्यावी लागली होती. मुदतवाढीनंतर दोन कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेस प्रतिसाद दिला. मात्र पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. परंतु अन्य कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे दोन कंत्राटदारांपैकी २ रुपये ६५ पैसे दराने चपातीचा पुरवठा करण्यास तयार असलेल्या कुमार फूड्स मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेसला एक कोटी ७४ लाख २६ हजार ४०० रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पालिकेच्या अंदाजपत्रकातील दरापेक्षा ५.१६ टक्के अधिक दराने पालिकेला चपाती घ्यावी लागणार आहे.