लाखो रुपये शुल्क उकळणाऱ्या विभागात विद्यार्थ्यांना सुविधाच नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लक्ष जाताच जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा फलक लक्ष वेधून घेतो. हा फलक ज्या लटकलेल्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत सध्या विद्यापीठाच्या तिजोरीत चांगलीच भर घालणाऱ्या या विभागाचे कामकाज सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षापुढे विभागात शिकणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक हतबल झाले आहेत.

दहा वर्षांहून अधिक काळ हा विभाग येथे काम करत आहे. परंतु, वर्षांला तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांचा महसूल देणाऱ्या या विभागात शिकणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी केवळ ५० आसनक्षमतेची वर्गखोली, वऱ्हांडय़ात तब्बल साडेतीन हजार पुस्तके असलेली कपाटे दिसतात; यालाच विभागाचे ग्रंथालय म्हटले जाते. पण ग्रंथालयाला स्वतंत्र जागा आणि ग्रंथपाल नसल्यामुळे या कुलूपबंद ग्रंथालयातील एकही पुस्तक विद्यार्थ्यांना वापरता येत नाही.

विभागात पाच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविले जात असून तेथे दरवर्षी १४० विद्यार्थी प्रवेश घेत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक लाख रुपये इतके शुल्क आकारले जाते. दोन वर्षांचे मिळून २८० विद्यार्थी या तुटपुंज्या जागेत शिक्षण घेत आहेत. तर २२ पीएच.डी. विद्यार्थीही येथे शिक्षण घेण्यासाठी रोज विभागात हजेरी लावत असतात. तब्बल एक लाख रुपये शुल्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गखोलीसारखी सुविधा देणेही विद्यापीठाला गेल्या तेरा वर्षांत शक्य झालेले नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरू लागले आहे. मुंबईसारख्या मायानगरीत माध्यमातील संधींचा विचार करता देशभरातील विविध भागांतून विद्यार्थी या विभागात शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. मात्र त्यांना सशुल्क वसतिगृहाची सुविधाही विद्यापीठाकडून मिळू शकत नसल्याने अनेकदा प्रवेशासाठी आलेले विद्यार्थी पुनर्विचार करतात.

या सर्व पाश्र्वभूमीवर विभागाने इमारतीतील इतर विभागांच्या खोल्या सामंजस्याने वापरून आपले काम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र इतके शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात नसतील तर ही फसवणूकच झाल्याचे विद्यार्थ्यांचे मत बनू लागले आहे. या संदर्भात विभागातर्फे विद्यापीठ प्रशासनाकडे स्मरणपत्र पाठविले जात आहे मात्र ढिम्म प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे हतबल होऊन एकविसाव्या शतकातही तुटपुंज्या सुविधांमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्टुडिओ नसल्याने उपकरणे वापराविना

विभागातर्फे एक स्टुडिओ उभारण्याची संकल्पना आखण्यात आली. हा स्टुडिओ उभारण्यासाठी बातम्या वाचताना लागणाऱ्या टेलिप्रॉम्पटरपासून आवश्यक साहित्यांची खरेदी दोन वर्षांपूर्वी साडेसात लाख रुपये खर्चून करण्यात आली. मात्र या साहित्यांचा वॉरंटी कालावधी संपला तरी त्याचा वापर करणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. कारण साहित्य वापरण्यासाठी आवश्यक तो स्टुडिओच अद्याप उभारला गेलेला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with students in mumbai university
First published on: 14-09-2016 at 01:25 IST