नगरसेविका हनिफाबी यांच्या निधनाने रिक्त झालेली प्रभाग क्रमांक १३५, चिता कॅम्पची पोटनिवडणूक रविवारी शांततेत पार पडली. विभागातील केवळ ३०.३१ टक्के मतदारांनी निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. प्रभागात एकूण ६ मुख्य मतदान केंद्रांतील ४६ ठिकाणी पार पडलेल्या या निवडणुकीत सात उमेदवार उभे राहिले होते. या प्रभागात ५३,९३९ मतदाते असून त्यात स्त्रियांची संख्या २४,७०४ इतकी आहे. यापेकी ८,३६८ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीची व्यवस्था मानखुर्द मनपा मराठी शाळा संकुल, तळमजला, स्टेशन मार्ग, मानखुर्द (पूर्व) येथे करण्यात आली आहे. मोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.