मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी विरोधात छात्र भारतीच्यावतीने रविवारी मुंबईत छात्र परिषद घेण्यात येणार आहे. देशभरातून अनेक समविचारी विद्यार्थी संघटनांचे नेते आणि मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थी नेत्यांबरोबरच गीतकार जावेद अख्तर, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री वर्षां गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार रोहित पवार, परिषदेचे स्वागताध्यक्ष फारूक शेख यांना आमंत्रित केले असल्याची माहिती परिषदेचे निमंत्रक सचिन बनसोडे यांनी दिली आहे. या संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला असता, ‘या परिषदेबद्दल माहिती नसून, त्या दिवशी माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या निर्दशनादरम्यान जामिया, अलिगढ विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली गेली. विद्यार्थ्यांनी सुरू केलेले हे आंदोलन आता जनआंदोलन होत चालले आहे. त्याचाच भाग म्हणून छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने परिषदेचे आयोजन केले आहे.

रविवारी ५ जानेवारीला यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट येथे दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद होईल. या छात्र परिषदेला देशभरातून विद्यार्थी नेते उपस्थित राहणार आहेत.

चित्रकारांचे धरणे :

सुधारिक नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात चित्रकारांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, शनिवारी आझाद मैदानावर मोठय़ा संख्येने चित्रकार जमणार असून तेथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. सेक्युलर मूव्हमेंट या फुले-आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या  सामाजिक संघटनेच्या वतीने हे धरणे आंदोलन होणार आहे. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ व राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे व कार्याध्यक्ष भरत शेळके यांनी दिली. तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे, अभिनेते अशोक लोखंडे, अनमोल धर्माधिकारी, प्रभाकर कांबळे आदी सहभागी होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatra bharati conference against citizenship amendment act zws
First published on: 04-01-2020 at 03:06 IST