उच्च न्यायालयाच्या शेरेबाजीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुख्यमंत्री एका पक्षाचे नेते आहेत का असे तोंडी ताशेरे उच्च न्यायालयाने ओढल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे दाखले देत तीव्र नापसंती व्यक्त केली. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी एकमेकांच्या अधिकारांचा सन्मान करावा असे सांगताना ‘उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी आपल्या मर्यादा ओळखाव्यात, सरकार चालवण्याचा प्रयत्न करू नये’, हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशातील वाक्य फडणवीस यांनी वाचून दाखवले.
उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढल्याची टीका विरोधी सदस्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत केली होती. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. उच्च न्यायालयाने ते विधान केले होते मात्र त्यांच्या लेखी आदेशात ते कोठेही नव्हते. त्यामुळे कायद्याप्रमाणे ते भाष्य कायदेशीर आदेश व मत ठरत नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. पण तरीही यानिमित्ताने कायदेमंडळ, न्यायालय, प्रशासन या तिन्ही स्तंभांच्या अधिकारांचा मूलभूत प्रश्न उभा राहिला आहे. कोणत्याही स्तंभाने दुसऱ्यावर अनाठायी शेरे मारू नये, एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, असे फडणवीस यांनी नमूद केले. पानसरे खटल्यात एकही कागद मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित नाही व त्या प्रकरणातील तपासाशीही राज्य सरकारचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्यावर भाष्य करू नये. प्रतिष्ठेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून त्यावरच हा घाला आहे, त्याचबरोबर उच्च न्यायालयाने आपल्या मर्यादा ओळखाव्यात. सरकार चालवणाऱ्या सम्राटासारखे वागण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांमधील एकापाठोपाठ एक विधाने मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ऐकवली. उच्च न्यायालयाचे शेरे कसे अप्रस्तुत होते हे त्यातून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर बोलताना त्या न्यायमूर्तीच्या मनात काही नसावे पण कारण नसताना इतरांबद्दल भाष्य करणे योग्य नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या एका फायलीवरील शेऱ्यावरून उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कशारितीने सुशीलकुमार यांच्या शेऱ्याला हेतू जोडणे चुकीचे असल्याचा निकाल दिला, याची आठवणही फडणवीस यांनी सांगितली.
माध्यमांनीही आता माझ्या भाषणाचे वृत्तांकन करताना जे बोलले गेले आहे तेच लिहावे. दोन स्तंभांमध्ये गैरसमज होईल असे वृत्त देऊ नये. अपवाद वगळता कोणी तसे करणार नाही, महाराष्ट्रातील माध्यमे जबाबदार आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.