मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा यांच्या अलिबाग-कोर्लई येथील कथित बेकायदा मालमत्तेविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यापूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

याचिकेनुसार, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी २९ एप्रिल २०१४ रोजी रोख १० लाख आणि २ कोटींचा धनादेश देऊन ९.५ एकर जागा वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतली. २०१९ मध्ये ग्रामपंचायतीकडून ती जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे करण्यात आली. २०२० मधील विधान परिषदेच्या निवडणुकीत ही जागा आपल्या पत्नीची असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रावर सांगितले. ठाकरे आणि वायकर यांनी १ एप्रिल २०१३ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता कर, घरपट्टी, दिवाबत्ती कर भरला. निवडणूक शपथपत्रात ठाकरे आणि वायकर यांनी जमीन दाखवली. पण त्यावरील १९ बंगल्यांची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.  यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून विविध विभागांकडे तक्रार केली. मात्र दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.