४० हजार रुग्णांवर ११८ आरोग्यदूतांकडून उपचार
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दुर्गम जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यतील बालमृत्यूच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी येथील गावकरीच आता ‘आरोग्यदूत’ झाले आहेत. गावांत वैद्यकीय सेवा पुरेशी नसल्याने गावातील सातवी ते नववीपर्यंत शिक्षित महिला आणि पुरुषांनी आरोग्यसुविधा देण्याचे शिवधनुष्य हाती उचलले आहे. २०१४-१५ या वर्षांत ११८ आरोग्यदूतांनी ४० हजार रुग्णांवर उपचार केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘आरोग्यदूूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
१३४ गावांत ३१ महिला आणि ३९ पुरुष ‘आरोग्यदूत’ म्हणून तर धानोरा तालुक्यातील ४८ आदिवासी गावांत ४८ आरोग्यसेवक आपले काम करत आहेत. आरोग्यदूतांच्या सेवेमुळे अनेक नवजात बालकांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत झाली आहे. ‘आरोग्यदूत’ म्हणून काम करणाऱ्या या मंडळींनी वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले असून, महिला आरोग्यदूत या महिलांची प्रसूती करण्याबरोबरच अकाली प्रसूती झालेल्या अर्भकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील, याचीही काळजी घेतात. अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी ‘घरोघरी नवजात बाळाची काळजी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, युगांडा, टान्झानिया या देशांमध्येही ‘घरोघरी नवजात बाळाची काळजी’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती ‘शोधग्राम’च्या उपक्रमाचे समन्वयक संतोष सावळकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या भागात काही वर्षांपूर्वी अर्भकांचा मृत्युदर दर एक हजारामागे १२१ इतका होता. मात्र विविध वैद्यकीय उपक्रम आणि कार्यक्रमांतून हा अर्भक मृत्युदर आता ८० पर्यंत आला आहे. गडचिरोलीत राज्य शासनाने दारूबंदी लागू केल्यानंतर आता गुटखामुक्त जिल्ह्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी या जिल्ह्यात अंदाजे २०० कोटींचा गुटखा फस्त करण्यात आला होता. नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्यात गुटख्याच्या घातक परिणामांबाबत जागृती करण्यासाठी ५० शाळांमध्ये आणि महिला बचत गटांमध्ये गुटखा बंदीचा कार्यक्रम राबविला जात असल्याचेही सावळकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आरोग्य स्वराज्य’ हे ‘शोधग्राम’चे ध्येय आहे. गावातील लोकांनीच आरोग्यसेवा पुरविणे हा ‘आरोग्यदूत’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजही डॉक्टर खेडय़ापाडय़ांमध्ये सेवेसाठी जाण्यास तयार नसल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.
– डॉ. अभय बंग,
संस्थापक ‘शोधग्राम’

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child deaths increased in gadchiroli district
First published on: 16-05-2016 at 02:43 IST