भूकंपग्रस्त कुटुंबांतील मुलांचे शोषण
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील किशोरवयीन मुलांना मायानगरीत आणून मजुरीला जुंपले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. स्वयंसेवी संस्था ‘प्रथम’ने गेल्या काही काळात १५६ नेपाळी मुलांची सुटका केली असून प्रत्यक्षात ही संख्या कैक पटींनी जास्त असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
सन २०१५मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे. याचाच फायदा घेत भूकंपग्रस्त कुटुंबातील लहान मुलांना प्रलोभने दाखवून शहरांमध्ये कामासाठी आणले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात नेपाळी बालकामगारांची सुटका करण्यात आली असून वास्तवात ही संख्या कल्पनेपलीकडे असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेपाळचे २६ जिल्हे हे भारताच्या सीमेला लागून आहेत. चंपारन, मोतीहारी जिल्ह्य़ांतून या मुलांना रक्सौल रेल्वे स्थानकातून मुंबई आणि अन्य शहरांच्या दिशेने नेण्यात येते. आतापर्यंत धारावी, नागपाडा, शिवडी या भागातून नेपाळी मुलांची सुटका करण्यात आली असून त्यातील बहुतेक चामडय़ाच्या बॅग बनविण्याच्या उद्योगात गुंतविण्यात आल्याचे उघड झाले आहे. स्वयंसेवी संस्था ‘प्रथम’ यांनी आतापर्यंत १५६ नेपाळी बालकामगारांची सुटका केली आहे. बालकामगारांच्या तस्करीचे लोण आंतरराज्य पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून ही समस्या गंभीर आहे, असे ‘प्रथम’चे प्रकल्प संचालक किशोर भामरे यांनी सांगितले. उत्तर भारतातील मुलांपेक्षा नेपाळी मुलांना आणखी कमी पैसे मोजण्यात येतात, त्यामुळे त्यांना शहरात आणण्याचे प्रमाण लक्षणीय असून त्यासाठी नेपाळ सरकार, सीमा सुरक्षा बल यांच्याशी समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारीही कारवाई
आग्रीपाडा परिसरातून सोमवारी आठ बालकामगारांची सुटका करण्यात आली. आठपैकी एक मुलगा नेपाळहून आणण्यात आला असून ७ बालके बिहार राज्यातील आहेत. सर्व मुले १४ वर्षांपेक्षाही कमी वयाची असून त्यांना बॅग तयार करण्याच्या कारखान्यात जुंपण्यात आले होते. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या बालसाहाय्यक पोलीस पथकाने स्वयंसेवी संस्था प्रथमच्या मदतीने ही कारवाई केली. सुटका करण्यात आलेला नेपाळमधील मुलगा गौर जिल्ह्य़ातील असून बिहारमधून आणलेली मुले मोतीहारी जिल्ह्य़ातील आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child labors trafficking from nepal
First published on: 10-05-2016 at 05:56 IST