चिपळूण साहित्य संमेलनाची सुरुवात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ध्वजवंदनेने होणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील काही वर्षांपूर्वीची ही परंपरा ठाणे, चंद्रपूर येथील संमेलनांपासून पुन्हा सुरू झाली आहे.
साहित्य संमेलनाची सुरुवात ध्वजवंदनेने करण्याची प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती. महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे उषा तांबे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी ही प्रथा पुन्हा सुरू केली. ठाणे येथे झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून ही प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या ध्वजावर विविध रंगांचे पट्टे आहेत. मराठी साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे प्रतिनिधीत्व हे रंग करतात. संमेलनाच्या संपूर्ण काळात हा ध्वज संमेलन स्थळी फडकत ठेवण्यात येतो.  साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षाकडून नवनिर्वाचित अध्यक्षाला पदकाच्या स्वरूपात संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्याची औपचारिकताही महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनापासून बंद करण्यात आली आहे. यावेळीही ती औपचारिकता पाळली जाणार नाही