Sakinaka Rape Case : “आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची”, चित्रा वाघ यांना भावना अनावर!

मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील पीडितेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यावर चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

chitra wagh
चित्रा वाघ यांची साकीनाका बलात्कार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर चित्रा वाघ यांनी संतप्त शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांना भावना अनावर झाल्या. “आम्ही यात काहीही करू शकलो नाही. आम्ही भाषणं देण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काहीही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख आहे”, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

साकीनाक्यामध्ये शुक्रवारी झालेल्या या बलात्कार प्रकरणात मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता. बलात्कार केल्यानंतर या नराधमाने पीडितेवर चाकूने वार देखील केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

“महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!”

चित्रा वाघ यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांना संतप्त आणि भावनिक प्रतिक्रिया दिली. “खरंतर मी नि:शब्द झालेय. माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाले. मी तिला बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. तिच्या गुप्तांगात रॉड टाकला गेला. हे कुठेतरी थांबायला हवं. आता आमचे शब्द संपले, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सरकारला, व्यवस्थेला सांगायचंय. गेल्या ८ दिवसांत १३ वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला, ६ वर्षांच्या मुलीवर रिक्षात बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळी अमरावतीत १७ वर्षांच्या ७ महिन्यांच्या गर्भवती मुलीवर बलात्कार झाला, तिने गळफास लावून संपवून घेतलं. साकीनाक्यातली ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. आम्ही यात काही करू शकलो नाही. आम्ही भाषणं करण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काही करू शकलो नाहीत. ही हार आहे आमची. आणि याचंच मला दु:ख आहे”, असं त्या म्हणाल्या.

 

“मला लाज वाटतेय हे बोलायला…”

“तिची आई, तिची मुलं तिथे बसले आहेत. त्यांचा काय दोष होता त्यात? ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झाला, हे नक्कीच एका माणसाचं काम नाही. तिची आतडी आतपर्यंत कापली गेली. तुम्ही विचार करा तिला काय वेदना झाल्या असतील? तिने काय सहन केलं असेल? पण या मुर्दाड सरकारसाठी आणि व्यवस्थेसाठी हा फक्त एक आकडा आहे. आम्ही अभिमानाने म्हणवून घेतो की आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत. पण आम्ही काय म्हणून सावित्रीच्या लेकी आहोत? आम्ही कुणालाही वाचवू शकत नाही आहोत. आम्ही भाषणं करण्यापलीकडे काही करू शकलो नाहीत. किती टाहो फोडायचा? हे अश्रू दिसत नाहीत? मला लाज वाटतेय हे सगळं बोलायला”, असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

Mumbai Rape: साकीनाकामधील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

“थोड्या तरी लाजा वाटू द्या…!”

“यशोमती ठाकूर म्हणतात चित्राताईंनी दिल्लीच्या प्रकारावर बोलावं, वर्ध्याच्या प्रकाराविषयी बोलावं, त्या राजकारण करतात. आम्ही बोलायचं नाही? सरकारची काय अपेक्षा आहे? आम्ही बोलायचं नाही? आणि जर हे राजकारण असेल तर आम्ही रोज करू. थोड्या तरी लाजा वाटू द्या. तुमच्या जाहिरनाम्यात महिलांची सुरक्षा पहिला मुद्दा होता. शक्ती कायदा कुठे आहे?” असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

“पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय द्यायचं काम करतायत. गुन्हे दाखल होत नाहीत. त्या विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम या सरकारने केलं आहे”, असा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केला.

 

“शिवाजी महाराज असते तर…”

सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे महाराष्ट्रात आजपर्यंत निघाले नव्हते. महाराज आज असते, तर यांना ढकलून दिलं असतं. सरकार म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही, असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chitra wagh on sakinaka rape victim death slams system political leaders uddhav thackeray government pmw