लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोटय़वधीच्या घोटाळाप्रकरणी महिन्यापासून फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ येथील वादग्रस्त आमदार रमेश कदम अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) जाळ्यात सापडले. पुणे- नगर रस्त्यावरील ग्रँड हयात या हॉटेलमधून सोमवारी पहाटे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना तत्काळ मुंबई येथे नेण्यात आले.
अण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले कदम यांच्यावर महामंडळात दीडशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्यामध्ये १८ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून कदम हे फरार होते. गुन्हा दाखल झाला त्या दिवशी संध्याकाळी कदम सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पूर्वीच्या एका गुन्ह्य़ात पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईबद्दल भूमिका मांडत होते. मात्र, स्थानिक पोलीसही पत्रकार संघात आले होते. हे पाहून कदम यांनी पत्रकार परिषद अध्र्यावर सोडून पलायन केले होते. कदम हे पुण्यातील ग्रँड हयात हॉटेलात असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलिसांना मदतीला घेऊन  कदम यांना ताब्यात घेण्याची घेतले.
कोठडीत रवानगी
आमदार रमेश कदम यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  कदम यांच्यासह आणखी तीनजणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कदम यांनी  अध्यक्षपदी असताना हा घोटाळा केला. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असलेला हा निधी कदम यांनी ते नेतृत्त्व करत असलेल्या संघटनांच्या खात्यात वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कदम कायम वादग्रस्त
आमदार कदम हे कायम वादग्रस्त राहिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना एका प्रकरणात अडकविण्यात त्यांचाच हात असल्याची चर्चा होती. ढोबळे यांचा पत्ता कापून कदम यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.