डॉक्टर, परिचारिका, रुग्णांच्या नातेवाईकांचाही सहभाग
कोणी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करीत होते तर कोणी मातीचे ढिगारे काढत होते. खिडक्यांपासून जमिनीपर्यंत आणि आवारापासून ते सांडपाण्याच्या पाइपपर्यंत सर्वत्र साफसफाई होत असल्याचे चित्र शनिवारी भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात पाहावयास मिळाले. गेले आठवडाभार रुग्णालयात स्वच्छता मोहीम सुरू होती. त्यावर अंतिम हात फिरविण्याचे काम शनिवारी प्राध्यापक, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका एवढेच नव्हे तर रुग्णांच्या नातेवाईकांनीही केल्यामुळे जे.जे. रुग्णालय चकाचक बनले आहे.
गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये जे.जे. रुग्णालयात साप्ताहिक स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने ‘स्वच्छ भारत’ अभियानची घोषणा करण्यापूर्वीपासूनच जे.जे. रुग्णालयात ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. ४२ एकरावर पसरलेल्या जे.जे. रुग्णालयात ५६ इमारती आहेत. दररोज रुग्णांसोबत येणारे हजारो नातेवाईक तंबाखूच्या पिचकाऱ्या मारण्यापासून इतस्तत: कचरा फेकत असल्यामुळे जे.जे.च्या भिंतींचे कोपरे लाल रंगाने माखलेले असत. डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठातापदाचा कारभार स्वीकारल्यापासून गेली चार वर्षे रुग्णालयात वार्षिक स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. यासाठी प्राध्यापक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या टीम करून वेगवेगळ्या भागांतील स्वच्छतेचा आढावा नियमितपणे घेतला जाऊ लागला. यंदाही गेले आठवडाभर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे.जे.मध्ये मोठय़ा प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळपासून डॉ. लहाने तसेच येथील प्राध्यापक, डॉक्टर तसेच निवासी डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकाने ४२ एकरवर पसरलेल्या जे.जे.तील स्वच्छता मोहिमेत सहभागी होत कोपरा न् कोपरा तपासला. या मोहिमेत रुग्णांच्या नातेवाईकांनाही सहभागी करून घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक रुग्णालये, त्यातही पालिका व शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण व नातेवाईक येत असतात. रुग्णालयाच्या आवारात प्लास्टिकच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थावरील कागदी किंवा प्लास्टिक आवरणे कोठेही टाकली जातात. याबाबत दंडात्मक कारवाईसह काही ठोस उपाययोजना केल्यास सार्वजनिक रुग्णालयेही स्वच्छ दिसतील. जे.जे. रुग्णालय स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी आम्ही क र्मचारी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनाही सहभागी करून घेण्यास सुरुवात केली. तसेच येथील मोकळ्या जागांमध्ये बागा फुलविल्या तसेच फळझाडेही लावल्याने लोकांमध्येही स्वच्छतेबाबत जागृती झाली आहे.
– डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning in jj hospital
First published on: 12-06-2016 at 01:23 IST