मुंबई : राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे यापुढे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार आता मुंबईप्रमाणेच राज्यभरातील लिपिकांच्या सर्व जागा लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत.

राज्यात विविध शासकीय विभागांतील १० लाख ७० हजार मंजूर पदांपैकी आठ लाख २६ हजार पदे भरण्यात आली असून, सुमारे २०-२२ टक्के म्हणजेच अडीच लाख पदे रिक्त आहेत. यातील सुमारे २५ ते ३० हजार पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील असून, उर्वरित पदे राज्य सरकारमार्फत भरण्यात येतात. रिक्त पदांपैकी यंदा ७५ हजार पदे भरण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यासाठी राज्य लोकसेवा आयोगावरील वाढता ताण, नोकरभरती वाढविण्याची बेरोजगार तरुणांची मागणी आणि विविध विभागांतील रिक्त पदांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील दुय्यम सेवा निवड मंडळे पुन्हा सुरू करण्याची चाचपणी काही दिवसांपूर्वी सरकारने सुरू केली होती. मात्र, दुय्यम सेवा निवड मंडळांचा आजवरचा अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि या मंडळांवर नेहमीच नोकरभरतीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने या मंडळांच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्याऐवजी अधिकाऱ्यांप्रमाणेच लिपिकांचीही पदे आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे, तसेच मुंबईतील लिपिकांची रिक्त पदे आयोगामार्फत भरली जातात. आता मुंबईप्रमाणेच राज्यभरातील लिपिकांचीही रिक्त पदे आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आयोगाच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले. तसेच आयोगाला अधिक सक्षम करण्यासाठी सदस्य आणि कर्मचारी वाढविण्याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस भरती प्रक्रिया..

राज्यात राबविण्यात येत असलेली पोलीस भरती प्रक्रिया अधिक गतीने आणि पारदर्शीपणे राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. सध्या ७२३१ पोलिसांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून, पोलीस महासंचालकांमार्फत पदभरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे. आणखी १० हजार भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या लेखी परीक्षेआधी शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून, त्यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.