एकीकडे राज्यात गारपीट सुरू असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरणाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. गोवा व दक्षिण कोकणात पावसाची सर पडण्याचीही शक्यता आहे. या वातावरणामुळे मुंबईत रात्रीचे तापमानही वाढले आहे.
बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त ढग घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात गारपीट होत आहे. येत्या ४८ तासांमध्येही गारपीट सुरू राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता अधिक असल्याने उत्तरेकडील थंडी तसेच पूर्वेकडून गारपीटीचा पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव मुंबई तसेच कोकण किनारपट्टीवर पोहोचत नाही. या सर्वाच्या एकत्रित परिणामामुळे शहरातील रात्रीचे तापमानही खाली उतरत नाही. थंडी आणि उन्हाळा यांच्यामधील स्थित्यंतराच्या काळात वातावरणात असे बदल घडतात. त्यामुळे त्याची तीव्रता बदलते, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.