मुंबईतील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम असते म्हणून खड्डे पडतात, असे खडे बोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना व भाजपला सुनावले. रस्त्यांच्या कामांचे त्रयस्तपणे लेखा परिक्षण करण्यास महापालिकेलीत सत्ताधाऱ्यांकडून विरोध का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, रस्त्यावर खड्डे पुन्हा-पुन्हा का पडतात, त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांवील खड्डय़ांमुळे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे आपण ऐकले आहे. परंतु राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. निकृष्ट दजाचे काम असते म्हणून रस्त्यावर खड्डे पडतात आणि तरीही त्याच त्या कंत्राटदारांना पुन्हा-पुन्हा रस्त्याची कामे दिली जातात.
रस्त्यांच्या कामांचे त्रयस्तपणे लेखापरिक्षण झाले पाहिजे, परंतु त्याला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून विरोध होत आहे, असा टोला त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या शिवसेना-भाजपला हाणला.
दुसरे असे की, त्याच त्याच कंत्राटदारांना रस्त्यांची कामे दिली जातात. त्यात अधिकाऱ्यांचाही हात असला पाहिजे. अधिकारी व कंत्रटदारांच्या संगनमताशिवाय हे घडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे चौकशीत आढळून आल्यास कंत्रटदारांबरोबरच दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यावर उभे राहून कंत्राटदाराकडून खड्डे भरून घेण्याऐवजी किंबहुना आपल्या प्रभागातील रस्ता तयार होत असतानाच त्याच्या दर्जाबाबत दक्ष राहण्याचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी मनसेने नौटंकीची मालिकाच सुरू केली आहे. अभियंत्यांना डाबून ठेवल्यानंतर, कंत्राटदारांना खड्डय़ात पाडून मारहाण केल्यानंतर मनसेने आता आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची नावे खड्डय़ांना देण्याची नौटंकी सुरू केली आहे.
खड्डय़ात गेलेल्या रस्त्यांमुळे मतदारांना तोंड देताना नगरसेवकांची त्रेधातिरपीट उडू लागली आहे. त्यामुळे मनसेचे नगरसेवक अधिकारी-कंत्रटदारांमध्ये दहशत निर्माण करून मतदारांची मने जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. दादरमध्ये प्रचंड खड्डे पडल्यामुळे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या तीन अभियंत्यांना विभाग कार्यालयात दिवसभर डांबून ठेवले होते. त्यानंतर काही दिवसांनी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना खड्डय़ात पाडून बेदम मारहाण केली. आता लालबहाद्दूर शास्त्री मार्गावरील हॉटेल गोल्डन पॅलेसच्या समोरील खड्डय़ाला पालिका आयुक्ताचे नाव देण्याचा ‘कार्यक्रम’ दिलीप लांडे यांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत उरकला. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), प्रमुख अभियंते (रस्ते) यांचीही नावे खड्डय़ांना देण्यात आली.
मनसेच्या नगरसेवकांनी नौटंकीची करण्यापेक्षा कंत्राटदाराकडून काळजीपूर्वक खड्डे बुजवून घेतले, किंबहुना रस्ते तयार होत असतानाच त्याच्या दर्जाबाबत जागरूकता ठेवली तर अशी नाटके करावी लागणार नाहीत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.