scorecardresearch

प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपा-शिंदे गटाचा कसब्यात पराभव, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “कार्यकर्त्यांनी…”

पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde Ravindra Dhangekar 2
एकनाथ शिंदे व रविंद्र धंगेकर (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. महविकासआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. महाविकासआघाडीने भाजपाच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात. पोटनिवडणुकांचं गणित वेगळं असतं आणि सार्वत्रिक निवडणुकांचं गणित वेगळं असतं. त्यामुळे एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. एका मतदारसंघाची निवडणूक राज्याची निवडणूक होत नाही. त्यांना आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या.”

“कसबा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदारांनी विश्वास दाखवला”

“ग्रामपंचायत निवडणुकांकडेही त्यांनी पाहावं. ७५०० ग्रामपंचायतींपैकी ४५०० ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपाचे सरपंच झाले. हे कशाचं उदाहरण आहे? कसबा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो,” अशी भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? अश्विनी जगताप यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाल्या…

“पुन्हा एकदा कसब्याच्या मतदारांची मनं जिंकली जातील”

“कसब्यात ज्या काही चुका, त्रुटी, उणिवा असतील त्या शोधून दुरुस्ती केली जाईल. पुन्हा एकदा कामाच्या माध्यमातून कसब्याच्या मतदारांची मनं जिंकली जातील. त्यामुळे मी कसब्यातील मतदारांनाही धन्यवाद देतो,” असंही मुख्यमंत्री शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 08:56 IST