scorecardresearch

राज्यात सीएनजी स्वस्त; किलोमागे ७ ते ८ रुपयांची घट, १ एप्रिलपासून अंमलबजावणी

सीएनजीच्या दरात कपात झाल्याने प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ‘सीएनजी’वरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) दहा टक्के कपात करण्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात आल्याने येत्या १ एप्रिलपासून हा वायू राज्यात प्रती किलो ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होईल.

सध्या ‘सीएनजी’वर १३.५ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारण्यात येतो. त्यात दहा टक्के कपात करून तो तीन टक्के करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्यानुसार वित्त विभागाने करात कपात करण्याची अधिसूचना जारी केली असून ती राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.

नैसर्गिक वायूवर तीन टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. हा बदल येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १ एप्रिलपासून अमलात येईल. या निर्णयामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना तसेच त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सीएनजीच्या दरात कपात झाल्याने प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे. करात कपात केल्याने सरकारच्या उत्पन्नात  ८०० कोटींची घट होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने १ तारखेपासून मूल्यवर्धित करात १० टक्के कपात केल्याने सीएनजी प्रती किलो ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होईल, असे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येत्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीएनजीबरोबरच पाइपद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरातही कपात होईल. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दरात प्रती किलो सुमारे १८ रुपये वाढ झाली होती. इंधनाचे दर वाढल्याने प्रवासी भाडय़ात वाढ करावी, अशी मागणी रिक्षा व टॅक्सी संघटना करीत होत्या. दरवाढीस परवानगी द्यावी अथवा कर कमी करावेत, असा पर्याय संघटनांनी दिला होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने मूल्यवर्धित करात दहा टक्के कपात करून टॅक्सी, रिक्षा तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांना दिलासा दिला आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीपासून दिलासा

इंधनाचे दर वाढल्याने प्रवासी भाडय़ात वाढ करावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केली होती. दरवाढीस परवानगी द्या किंवा कर कमी करा, असे पर्याय संघटनांनी दिले होते. त्यानुसार सरकारने व्हॅट कमी करून भाडेवाढीला पर्याय दिला आहे.  

सामान्यांना लाभ..‘सीएनजी’वरील करात कपात केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल. सध्या इंधनाचे दर वाढत असून, नैसर्गिक वायूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करात कपात केल्याने सामान्यांवर त्याचा बोजा पडणार नाही.

राज्य सरकारने व्हॅटमध्ये १० टक्के कपात केल्याने सीएनजी प्रती किलो ७ ते ८ रुपयांनी

स्वस्त होईल. येत्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

 – उदय लोध, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cng cheaper in the state decrease of rs 7 to 8 per kg effective 1st april akp

ताज्या बातम्या