अननुभवी शिक्षकांमार्फत प्रात्यक्षिक परीक्षा ‘उरकण्याचे’ आदेश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्याने ‘तृतीय वर्ष विज्ञान’ शाखेच्या (बीएससी) सोमवारपासून होणाऱ्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
रसायनशास्त्र विषयासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून ३६० परीक्षकांची गरज आहे. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी परीक्षकांना प्राध्यापकांना अध्यापनाचा पुरेसा अनुभव असावा लागतो. मात्र केवळ ३० ते ३५ प्राध्यापकांनी प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये सहभाग घेण्यास अनुमती दर्शविली आहे.
‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू)च्या बहिष्काराला न जुमानता बीएस्सीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम आहे. जे प्राध्यापक परीक्षेच्या कामात सहभागी होतील त्यांनी उपलब्ध व्यक्तींच्या मदतीने प्रात्यक्षिक परिक्षा घ्यावी, असे विद्यापीठामार्फत कळविण्यात येत आहे. त्यामुळे या प्राध्यापकांना अननुभवी शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागणार आह़े