मुंबई : खासदार नवनीत राणा यांची एमआरआय चाचणी करण्यासाठी नेत असताना त्यांची छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर टाकल्याप्रकरणी लीलावती रुग्णालयाने वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे सीसीटीव्ही चित्रीकरणही सादर केले आहे.

 खासदार नवनीत राणा या मानदुखी व पाठदुखीवर उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या वेळी एमआरआय चाचणीसाठी नेले जात असतानाची छायााचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. रुग्णालयाने एमआरआय विभागात कॅमेरा नेण्यास परवानगी कशी दिली, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. त्यातच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लीलावती रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता. तसेच वांद्रे पोलीस ठाण्यासह लीलावती रुग्णालयात तक्रारही केली होती. मात्र आता लीलावती रुग्णालयानेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राणा यांना तळमजल्यावरील एमआरआय कक्षात नेले जात असताना पांढरा शर्ट घातलेल्या इसमाने परवानगी न घेता राणा यांची छायाचित्रे घेतली. एमआरआय मशीनच्या जवळ इलेक्टॉनिक वस्तू व कॅमेरा नेण्यास बंदी आहे, तशा सूचना त्या मजल्यावर लिहिलेल्या आहेत. मात्र नियमभंग करून या इसमाने त्या कक्षात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.