राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोलापुरात दीपक साळुंखे तर अहमदनगरमध्ये अरुण जगताप यांना उमेदवारी
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असून मागील निवडणुकीप्रमाणे जागा वाटपावर सहमती झाली आहे.

विधान परिषदेच्या आठ जागांसाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही निवडणूक होत आहे. त्यातील सात जागांवर आघाडीचे उमेदवार राहतील. गेल्या निवडणुकीप्रमाणे ७ पैकी काँग्रेस ४ आणि राष्ट्रवादीला ३ जागांवर उमेदवार देणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. सोमवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

काँग्रेसने अकोला-बुलढाणा विधान परिषद मतदासंघाच्या जागेवर दावा केला होता. मात्र, गेल्या निवडणुकीत केवळ सात-आठ मतांनी पराभव झाल्याने या जागेसाठी राष्ट्रवादीचा आग्रह होता. जागांच्या वाटाघाटीसाठी दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन बैठका झाल्या. सोमवारी सकाळी नागपुरात पुन्हा बैठक झाली. त्यात गेल्या निवडणुकीतील सूत्रानुसार जागा वाटपावर तोडगा निघाला.
मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेकडे आवश्यक बळ असल्याने त्या जागेवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही. काँग्रेसने उमेदवारांचे अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्लीतून उद्या किंवा परवा केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. विधान परिषदेच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान व ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी १० डिसेंबरला असून १२ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे.

दोन उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीने सोलापूरमधून दीपक साळुंखे व अहमदनगरमधून अरुणकाका जगताप या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव उद्या जाहीर करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

अणेप्रकरणी सभागृहात भूमिका मांडू -चव्हाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेले वक्तव्य ही सरकारची भूमिका आहे काय, याबाबतचा खुलासा केला पाहिजे. घटनात्मक पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे जाहीर वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. गुजरातमध्ये मुंबई जाऊ नये म्हणून १०६ हुतात्मा झाले, विदर्भासाठी नव्हे, असे विधान अणे यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून शिवसेनेने आज निदर्शने केली. यासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय, अशी विचारणा केली असता काँग्रेस आपली भूमिका सभागृहात मांडेल, असे ते म्हणाले.

असे झाले जागावाटप

* काँग्रेस- मुंबई, नागपूर, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अशा चार जागा
* राष्ट्रवादीकडे अहमदनगर, सोलापूर आणि बुलढाणा-अकोला-वाशिम