राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार हे काही प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या नेत्यांची संध्याकाळी उशीरा सोनिया गांधी यांच्याबरोबर बैठक होणार असून राज्यात रिक्त असलेल्या विधासभा अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केले जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होतांना पदांच्या वाटपानुसार विधानसभा अध्यक्ष हे पद काँग्रेसकडे आलं होतं. नाना पटोले हे विधानभेचे अध्यक्षही बनले होते. मात्र राज्यात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आक्रमक चेहरा हा असावा या हेतूने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार अर्थसंकल्पाच्या तोंडावर फेब्रुवारीत नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच पावसाळी अधिवेशन पार पडले तरी विधानसभा अध्यक्ष पदाची जागा भरण्यात आली नाही, त्यासाठी निवडणुक घेण्यात आली नाही. यामुळे काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. हिवाळी अधिवेशनात ही निवडणुक झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतल्याने आता अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. ही निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णयही मंत्रीमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला.

असं असलं तरी विधीमंडळ अधिवेशन तोंडावर आले असतांना काँग्रेसकडून अजुनही विधानसभा अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित करण्यात आलेले नाही. तेव्हा दिल्लीवारी करत बैठका होत हे नाव निश्चित केलं जाणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसचे काही नेते दिल्लीत पोहचले आहेत. आज रात्री उशीरापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.