सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाध्यक्षा असताना आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच झुकते माप दिले जात असे. राहुल गांधी यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दलची अढी लपून राहिलेली नाही आणि राष्ट्रवादीनेही राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद आल्याने राष्ट्रवादीला तेवढे महत्त्व मिळणे कठीण मानले जाते.

सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत शरद पवार यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली. तरीही २००४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोनियांनी पवारांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन आघाडीसाठी आवाहन केले होते. यूपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीला नेहमीच झुकते माप मिळाले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या कलाने सारे निर्णय काँग्रेसकडून घेतले जाऊ लागले. २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले तरीही काँग्रेसने पवारांचा सन्मान ठेवला होता. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी कितीही नाके मुरडली तरीही सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घेतले. पवार किंवा राष्ट्रवादी नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेतली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी प्रवासात पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेत नाहीत म्हणून टोमणे मारले. महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवायची असल्यास राष्ट्रवादीचे पंख कापले गेले पाहिजेत, अशी राहुल गांधी यांची पहिल्यापासून रणनीती होती. राष्ट्रवादीच्या कलाने घ्यायचे नाही याच्यावर त्यांचा कटाक्ष होता. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित जागावाटप करण्यास राहुल यांनी विरोध दर्शविला होता. सोनिया गांधी या तेव्हा परदेशात होत्या. काँग्रेस पक्षात चर्चा तरी कोणाशी करणार अशी हतबलता तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली होती. गुजरातमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली होती. गेल्या वेळी मिळालेल्या नऊ जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. पण नंतर आणखी कमी जागा घेण्याची तयारी दर्शविली होती. तरीही काँग्रेस नेतृत्वाने राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचेही टाळले.

पुण्याजवळील लवासा प्रकल्पाला परवानगी देऊ नका म्हणून राहुल गांधी यांच्या कार्यालयाने दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मागे तत्कालीन पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना केला होता. लवासा प्रकल्पासाठी पवार आग्रही असताना नटराजन यांनी केलेला आरोप बराच बोलका असल्याचे मानले जाते. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता राहुल गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कितपत जुळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपचा पाडाव करण्याकरिता आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेसने एकत्र येणे आवश्यक आहे. पण जागावाटपाचा मुद्दा त्रासदायक ठरू शकतो, असे बोलले जाते. अलीकडेच शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल अनुकूल भूमिका किंवा गांधी कुटुंबियांवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले असले तरी काँग्रेसने हे फारसे गांभीर्याने घेतलेले नाही.

तरुण नेत्यांचे महत्त्व वाढणार

राज्य काँग्रेसमध्ये राजीव सातव, अमित देशमुख, वर्षां गायकवाड, प्रणिती शिंदे आदी तरुण नेत्यांचे महत्त्व वाढण्याची चिन्हे आहेत. जुने आणि नवे असे समीकरण साधाताना अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील या नेत्यांबरोबरच तरुण नेत्यांना सामावून घेतले जाईल.