राष्ट्रवादीने केलेली निम्म्या जागांची मागणी काँग्रेसला मान्य नसल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीची चर्चा अद्यापही फारशी पुढे सरकू शकलेली नाही. स्थानिक पातळीवर तिढा सुटत नसल्याने दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या पातळीवर आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. याशिवाय पूर्वीएवढी राष्ट्रवादीची ताकद राहिलेली नाही. परिणामी एवढय़ा जागांची राष्ट्रवादीची मागणी मान्य करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेसकडून प्रदेश पातळीवरून माजी आमदार मधू चव्हाण, संजय चौपाने तर राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव आदी चर्चेत सहभागी झाले आहेत. प्रभाग क्र. ५९ आणि ९३ या दोन प्रभागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीने दावा केला आहे.

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद या शहरात जास्त असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. जागावाटपाच्या चर्चेत फारशी प्रगती होत नसल्याने गेले दोन दिवस पुढील चर्चाच झालेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असा पर्याय पुढे आला आहे. कोणी किती जागा लढवायच्या हे निश्चित होत नसल्याने चर्चा कशाला करायची, असा सवाल स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसने ६० टक्के तर राष्ट्रवादीने ४० टक्के जागा लढवाव्यात, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. अर्थात, हा प्रस्ताव राष्ट्रवादीला अमान्य आहे. भाजप वा शिवसेनेची युती होणार नसल्यास आघाडी होऊ नये, असाही प्रयत्न आहे. आघाडीला आमची तयारी आहे. तथापि, आघाडीत वस्तुस्थितीनुरूप जागावाटप व्हावे, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही आघाडीची तयारी दर्शविली.

काँग्रेसच्या मुलाखती सुरू

फार काही यशाची अपेक्षा नसल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती, पण २७ गावे व डोंबिवलीमधील काही प्रभाग वगळता अन्य प्रभागांमधून उमेदवारीसाठी अर्ज आले आहेत. ६ तारखेला संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील.