मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १८ लोकांचे बळी गेले आहेत, त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजून काही लोक अडकलेले आहेत. मदतकार्य सुरू आहे, रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, अशा दु:खद व वेदनामय परिस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याच भागात रोड शो आयोजित केला जातो, सत्तापिपासू भाजपची संवेदनशीलता संपलेली आहे, अशा कठोर शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
महाराष्ट्रात पाचव्या व शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी नाशिक व कल्याण येथे जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर सायंकाळी त्यांचा घाटकोपरमध्ये येथे रोड शो पार पडला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपरचा भाग येतो. याच भागातील पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून त्यात १८ जण मृत्युमुखी पडले, अनेक जण जखमी झाले. त्याच वेळी मोदी यांचा घाटकोपर येथे रोड शो आयोजित करण्यात आला. यावरून व़ेडेट्टीवार यांनी मोदी व भाजपवर जोरदार टीका केली.
हेही वाचा >>> अजित पवार कुठे आहेत?
मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला. तरीदेखील भाजपचा रोड शो थांबला नाही. राज्यात मोदींची आतापर्यंत १७ वी प्रचारसभा पार पडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ राहुल गांधी यांची मोदींना भीती वाटते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मोदी असंवेदनशील संजय राऊत
घाटकोपरमधील दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे पण या दुर्घटनेत १८ मुंबईकरांचा मृत्यू झालेला असताना त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करीत आहेत. यावरून मोदी किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येत आहे. मोदी यांना मुंबईकर धडा शिकवतील असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. मोदींनी ज्या ज्या ठिकाणी सभा, रोड शो घेतले आहेत त्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडणार, असे भाकीत राऊत यांनी केले.