मुंबई-सिंधुदुर्ग सागरी महामार्ग

मुंबई : मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी महामार्ग (रेवस ते रेड्डी) प्रकल्पाला मागील महिन्यात राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आठ खाडीपूल बांधण्यात येणार आहेत. यात रेवस, दिघी, बाणकोट, केळशील, दाभोळ, भाट्ये आणि वाडातिवरे पुलांचा समावेश आहे.

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी, तसेच कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ७१५ किमी लांबीच्या या सागरी महामार्गाला ६ सप्टेंबर रोजी सरकारने मान्यता दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्यात येत असून प्रकल्पाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

 पहिल्या टप्प्यात आठ खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी याला दुजोरा दिला.

मूळ रेवस ते रेड्डी सागरी मार्ग आहे. मात्र हा मार्ग अर्धवट आहे, काही ठिकाणी पूल नाहीत, पूल आहेत तर त्यांची दुरवस्था आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.  मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला असताना कोकणात जाण्यासाठी भविष्यात हा सागरी महामार्ग आणि त्याबरोबरीने ४०० कि.मी.चा मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. मूळ रेवस ते रेड्डी सागरी मार्गादरम्यान अनेक खाड्या असून त्या ओलांडून सागरी मार्ग पुढे न्यावा लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आठ नवीन खाडीपूल बांधण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.