दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यास तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. पहिल्या टप्प्यातील जेमतेम दहा टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले असून येत्या एप्रिलपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे  नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. त्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होणार आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. एमएमआरडीएकडे स्मारक उभारणीचे काम असून यासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २१ मार्चला स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. स्मारकाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्प्यासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या टप्प्यात बांधकाम (सिव्हिल वर्क) केले जाणार आहे. यात स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह््य सजावट, वाहनतळ उभारणी, बगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.         

पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी या कामाचा आढावा घेतला. कामाचा वेग वाढवून स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी के ली.

आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील साधारण १० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. समुद्र किनाऱ्यालगत स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामाला पाण्याचा आणि वाऱ्यापासून धोका निर्माण होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पायाचे (पायलिंग) काम करण्यात येत आहे. काही अडचणींमुळे पहिल्या टप्प्यातील काम दोन महिने विलंबाने सुरू आहे. मात्र आता कामाचा वेग वाढवून एप्रिल २०२२ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या टप्प्यात विविध कामे

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येणार असून यात तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा / गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक, इत्यादी कामाचा समावेश आहे. स्मारकात एक मोठे कुंड उभारण्यात येणार असून लवकरच या कुंडाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ही सर्व कामे तातडीने पूर्ण करून स्मारकाचे लोकार्पण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

स्मारकाच्या कामासाठी महापौर बंगल्यातील ३० ते ४० झाडे कापावी लागणार होती. पण आता मात्र एकही झाड न कापता काम करण्यात येत आहे. झाडे वाचवून काम करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या आराखड्यात अनेक बदल करावे लागले. त्यामुळेही कामाला काहीसा विलंब झाला. पण झाडे वाचली ही बाब समाधानकारक आहे.

-एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए