करोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्तीची; निष्काळजी शाळांवर कारवाई करण्याचा इशारा

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सोमवारपासून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र उपाययोजनांच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पालिकेचा शिक्षण विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालयांतील पथके शाळांची नियमित तपासणी करणार आहेत.

मुंबईमध्ये गणेशोत्सवानंतर करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सध्या करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याने आणि शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे अखेर येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे उघडण्याची परवानगी देण्यात आली. मुंबई महापालिका आयुक्तांनीही नियमावली जाहीर करून गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. शासन आणि पालिकेकडून परवानगी मिळताच मुंबईतील शाळांमध्ये स्वच्छता आणि र्निजतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांद्वारे पालकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

कारवाईचा बडगा

करोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना बाधा होऊ नये यासाठी शाळा प्रशासनाने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यात कसूर होऊ नये यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची भरारी पथके, तसेच २४ प्रशासकीय विभागांतील पथके शाळांची पाहणी करणार आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव आढळल्यास, एखाद्या वर्गात मुखपट्टीविना विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आढळल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनाला समज देण्यात येणार आहे. भरारी पथकांनी पाहणी केल्यानंतर त्रुटी न सुधारणाऱ्या शाळा वा नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित वर्ग बंद करण्यात येणार आहे. वर्ग बंद केल्यानंतर अन्य वर्गामध्येही तशीच परिस्थिती आढळल्यास संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी शाळाच बंद करण्याचे आदेश देण्यात येतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

शाळा दीड वर्षांनी सुरू होत आहेत. करोना संसर्गाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे शाळांमध्ये करोनाविषयक प्रतिबंधक आदेशांचे पालन करावेच लागेल. उपाययोजना करून स्वत:चे आणि इतर सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी. पालिकेवर कारवाईची वेळ आणू नये.

सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त