मुंबई : राज्यात गेली दोन वर्षे लागू असलेले सर्व करोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. मुखपट्टीच्या सक्तीतून नागरिकांची सुटका झाली असून, यापुढे तिचा वापर ऐच्छिक असेल. हा निर्णय गुढीपाडव्यापासून लागू होईल़. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुखपट्टीसह विविध निर्बंध लागू होत़े राज्य निर्बंधमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. या निर्बंधातून राज्यातील जनतेची शनिवारी गुढीपाडव्यापासून सुटका होईल़  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना निर्बंधासंदर्भातील आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध राहणार नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने १४ मार्च २०२० पासून निर्बंध लागू केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली. गेली दोन वर्षे करोनास्थितीनुसार लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधाचा अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. करोना साथ नियंत्रणात आल्यानंतरही लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने उपनगरीय लोकलमध्ये प्रवासासाठी लसीकरण बंधनकारक केले होते. तसेच अधिक प्रमाणात लसीकरण झालेल्या मुंबईसह १४ जिल्ह्यांतील निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध शिथिल करताना मुखपट्टी, अंतर नियम, लसीकरण बंधनकारक करण्यात आले होते. तसेच राजकीय सभा, मैदाने, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली होती.

केंद्र सरकारने गेल्याच आठवडय़ात राज्यांना निर्बंध मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसारच राज्य सरकारने करोना निर्बंध मागे घेतले आहेत. आता नागरिकांना मुखपट्टीशिवाय कुठेही फिरता येऊ शकेल़  रेल्वे, बस अशा सार्वजनिक प्रवासासाठीही आता लसीकरण प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पासची गरज लागणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व नागरिकांनी करोनाशी लढताना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वाचे आभार मानल़े या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथांच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभात उत्साहाला मुरड घातली़ पोलीस यंत्रणा, महापालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने करोनाशी दिवस-रात्र लढा दिला, याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांचे आभार मानल़े

मुखपट्टीबाबत काहींचा वेगळा सूर

मुखपट्टीची सक्ती रद्द करू नये, असे मंत्रिमंडळातील काही जणांचे मत होते. मात्र, साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन हे कायदे मागे घेतल्याने मुखपट्टी सक्ती करता येणार नाही, याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे मुखपट्टी ऐच्छिक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

खबरदारी आवश्यक

निर्बंध मागे घेण्यात येत असले तरी भविष्यात करोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी़ त्यामुळे नागरिकांनी मुखपट्टी वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, करोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी आपली आणि इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल़े

स्वागतयात्रा उत्साहात..

दोन वर्षांनंतर प्रथमच कोणताही सण निर्बंधाशिवाय साजरा करता येणार आहे. गुढीपाडव्यापासून राज्य निर्बंधमुक्त होत असल्याने या नववर्षदिनी काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांवर कोणतीही बंधने नसतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे. जयंतीदिनी १४ एप्रिलला राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका निघतात. मिरवणुकांवर निर्बंध नसतील. तसेच मुस्लीम बांधवांना दोन वर्षांनंतर रमजान उत्साहात साजरा करता येईल.