scorecardresearch

१२-१४ वयोगटातील ४४,००० मुलांचे लसीकरण; सातारा, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक; मुंबई, ठाणे, पुण्यात मात्र अल्प प्रतिसाद

१२ ते १४ वयोगटातील लसीकरणाला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी मागील दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी मागील दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात या वयोगटातील सुमारे ४४ हजार ८७० बालकांना लस देण्यात आली आहे.  या वयोगटाचे सर्वाधिक लसीकरण सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. परंतु, मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये बालकांच्या लसीकरणाला अजूनही अल्प प्रतिसाद मिळत आहे. 

बुधवारपासून १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले, परंतु पहिल्याच दिवशी कोविन अ‍ॅप अद्ययावत होण्यास बराच वेळ गेल्यामुळे लसीकरणास विलंब झाला.  त्यात पहिल्या दिवशी लसीकरणाला फारसा प्रतिसादही नव्हता. त्यामुळे केवळ १ हजार ३७७ बालकांचे लसीकरण या दिवशी होऊ शकले. तर गुरुवारी आणि शुक्रवारी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कोविनच्या आकडेवारीमधून निदर्शनास येत आहे.  शुक्रवारी संध्याकाळी सातपर्यंत कोविन अ‍ॅपनुसार राज्यभरात ४४ हजार ८७० बालकांचे लसीकरण झाले. राज्यात सर्वाधिक १० हजाराहून अधिक बालकांचे लसीकरण सातारा जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये पाच हजारांहून अधिक बालकांनी लस घेतली आहे. यानंतर सांगली, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये मात्र या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद होते. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत ५७७ बालकांनी लस घेतली आहे. पुण्यात हे प्रमाण दीड हजाराहून अधिक तर ठाण्यामध्ये बाराशेहून अधिक बालकांनी लस घेतली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शहरी भागांमध्ये या बालकांच्या लसीकरणासाठी पालक फारसे पुढे येत नसल्याचे आढळले आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी करोनाचे १७१  नवे रुग्ण  आढळले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी ३९४ रुग्ण बरे झाले असून  सध्या १ हजार ६८० रुग्ण उपचाराधीन आहेत.

या जिल्ह्यांमध्ये शून्य लसीकरण

 कोविन अ‍ॅपच्या आकडेवारीनुसार गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, वर्धा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे १२ ते १४ वयोगटातील एकाही बालकांचे लसीकरम्ण झालेले नाही. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड येथे बालकांच्या लसीकरणास अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona vaccination children age group satara kolhapur mumbai thane pune little response ysh

ताज्या बातम्या