मुंबई : भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गुरुवारी ओलांडला. त्यापैकी ७० टक्के लसीकरण हे दहा राज्यांत झालेले आहे. देशातील इतर राज्यांमध्ये विशेषत: ईशान्यकडील राज्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे समोर आले आहे. सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हे पुढील आव्हान असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशभरात साधारण ७४ टक्के नागरिकांची लशीची पहिली मात्रा तर ३१ टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. ७० टक्के म्हणजेच सुमारे ७० कोटी ७४ लाख लसीकरण हे दहा राज्यांमध्येच झाले आहे. यात सर्वाधिक उत्तरप्रदेशमध्ये आणि त्याखालोखाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. त्या तुलनेत ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये मात्र लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. देशभरात महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या केरळमध्ये साडे तीन कोटी लसीकरण झाले आहे. देशभरात लसीकरणामध्ये केरळचा अकरावा क्रमांक आहे.

वितरण धोरण अवैज्ञानिक

लसीकरण वितरण हे केवळ लोकसंख्येवर आधारित असणे पुरेसे नाही. देशभरातील किमान जोखमीच्या गटातील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्राचे लसीकरण धोरण हे अवैज्ञानिक असून यामध्ये वितरणासह लशींच्या उपलब्धतेबाबतही आजपर्यंत अनेक गोंधळ झाले आहेत. लसीकरणाबाबतच्या धोरण लकव्यामुळे मे महिन्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला. याचा फटका पुढील दोन महिने तरी सर्व राज्यांना बसला. अन्यथा १०० कोटी लसीकरण यापूर्वीच झाले असते, असे मत ‘फोरम फॉर मेडिकल एथिक्स सोसायटी’च्या व्यवस्थापकीय संचालक सुनीता बंडेवार यांनी व्यक्त केले.

ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष

गेल्या काही महिन्यांपासून ईशान्येकडील राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. परंतु तुलनेत या राज्यांमध्ये देशभरात सर्वात कमी लसीकरण झाले आहे. आसाममध्ये दोन कोटींहून अधिक लसीकरण झाले आहे. त्रिपुरा (३५ लाख), मणिपूर (१८ लाख), मेघालय (१६ लाख), अरुणाचल प्रदेश(१२ लाख), नागालँड (११ लाख), सिक्कीम (नऊ लाख) या राज्यांमध्ये लसीकरण अत्यंत कमी प्रमाणात झालेले आहे. ईशान्य भागातील ७० टक्के रुग्णसंख्या असलेल्या मिझोराममध्ये तर केवळ सहा लाख जणांचे लसीकरण झाले आहे.

इतर राज्यांनाही धोका

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही एवढ्या मोठ्या संख्येने राज्यांनी लसीकरण केले यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे नक्कीच कौतुक आहे. परंतु साथरोग हा जेवढा काळ पसरेल तेवढा विषाणू परिर्वतित होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काही राज्यांमध्ये लसीकरण जोमाने झाले असले तरी ज्या राज्यांकडे दुर्लक्ष झाले तेथे करोना फोफावत राहिला तर विषाणू परिवर्तीत होण्याची शक्यता अधिक आहे, असे साथरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

सर्वाधिक लसीकरण झालेली राज्ये

उत्तर प्रदेश – १२.२६ कोटी

महाराष्ट्र – ९.३७ कोटी

पश्चिम बंगाल – ६.८९ कोटी

गुजरात – ६.७८ कोटी

मध्यप्रदेश – ६ कोटी ७५ लाख

बिहार – ६.०४ कोटी

कर्नाटक – ६.२० कोटी

राजस्थान – ६.१० कोटी

तामिळनाडू – ५.४२ कोटी

आंध्रप्रदेश – ४.८७ कोटी