मुंबई : मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्यास शुक्रवारी केवळ ८६० जणांचे लसीकरण बाकी राहिले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात झाल्यावर काही तासांतच मुंबई पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठणार आहे. पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण राज्यात प्रथम मुंबईत होत आहे.

कोविनच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री नऊपर्यंत मुंबईत ९२ लाख ३५ हजार ६८६ जणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत लस घेण्यासाठी ९२ लाख ३६ हजार ५४६ नागरिक पात्र आहेत.

मुंबईत शुक्रवारपर्यंत पहिल्या मात्रेचे ९९.९९ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे शनिवारी नक्कीच पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल. जनतेचा मोठा सहभाग मिळाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यात राज्य सरकारनेही लसीकरणाच्या धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा दिल्यामुळे पालिकेला वेगाने लसीकरण करता आले, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईने पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण आकडेवारीनुसार पूर्ण केले असले तरी यात सुमारे १० टक्के लसीकरण हे मुंबईबाहेरील जनतेचे झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे १०० टक्केचे लक्ष्य पूर्ण झाले असले तरी पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरूच राहणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.

आता दुसरी मात्रा पूर्ण करण्याचे लक्ष्य

दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी अजून ३५ टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. तेव्हा आता यावर अधिक भर दिला जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या मात्रेचे सर्वाधिक ५३ कोटी ६६ लाख ८९५ लसीकरण १८ ते ४४ वयोगटाचे झाले आहे. त्या खालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील २० लाख ४६ हजार, ६० वर्षावरील सुमारे ११ लाख ७५ हजार आणि आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील ४ लाख २५ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. शुक्रवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार मुंबईत दोन्ही मात्रांचे एकत्रित १ कोटी ५१ लाख ९६ हजार ९२२ लसीकरण झाले आहे.\

लस नसल्यास ‘टीएमटी’च्या बसमध्ये प्रवेश नाही

ठाणे : महापालिका क्षेत्रातील करोना लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने ‘हर घर दत्तक ’उपक्रम हाती घेतला आहे. त्यापाठोपाठ आता लशीची एकही मात्रा घेतलेली नाही अशा नागरिकांना टीएमटीच्या बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असा सक्तीचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.