राज्यात पुरेपूर लसवापर

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजे तीन कोटी ४४ लाख ६१ हजार ५५० लसमात्रा वितरित केल्या आहेत.

|| शैलजा तिवले
सर्वाधिक मात्रा मिळालेल्या उत्तर प्रदेशात मात्र ढिलाई

मुंबई : मागणीपेक्षा पुरवठा कमी असतानाही महाराष्ट्राने करोनाची एकही लसमात्रा वाया न घालवता त्यांचा पुरेपूर वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  मिळालेल्या एकूण लसमात्रांमधून तीन लाख ५९ हजार ४९३ अतिरिक्त मात्रांचा वापर महाराष्ट्राला करता आला. दुसरीकडे आत्तापर्यंत सर्वाधिक लशींचा पुरवठा केलेल्या उत्तर प्रदेशने १३ हजार २०७ लसमात्रा वाया घालवल्याचे लोकसभेत जाहीर केलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे.

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजे तीन कोटी ४४ लाख ६१ हजार ५५० लसमात्रा वितरित केल्या आहेत. त्यातील १३,६०७ मात्रा या राज्याने वाया घालवल्या आहेत. महाराष्ट्राने मात्र लसमात्रांचा नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक वापर केला. एकही लसमात्रा वाया घालवली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

केंद्राने महाराष्ट्राला २० जुलैपर्यंत सुमारे तीन कोटी १४ लाख लसमात्रांचा पुरवठा केला. राज्यात सुमारे तीन कोटी सहा लाख जणांना लशीची पहिली मात्रा, तर सुमारे ९२ लाख ७५ हजार जणांना दुसरी मात्रा दिली गेली. एका लसकुपीत १० मात्रा (म्हणजे सहा मिलिलीटर लस) असतात. एक मात्रा ०.५ मिलिलीटरची असते. त्यामुळे फक्त पाच मिलिलीटर लशीचा वापर केला जातो. उर्वरित एक मिलिलीटरमध्ये आणखी दोन मात्रा उपलब्ध होतात. म्हणजेच एका कुपीत असलेल्या ११ ते १२ लसमात्रांचा महाराष्ट्राने पुरेपूर वापर केला. त्यामुळे केंद्राने दिलेल्या लसमात्रांमधून ३ लाख ५९ हजार ४९३ अतिरिक्त मात्रांचा उपयोग महाराष्ट्राने केला. अशारितीने अधिकच्या मात्रांचा वापर केलेले महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे.

देशभरात सर्वाधिक सुमारे पाच लाख ८८ हजार अधिक मात्रांचा वापर तमिळनाडूने केला आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगाल (४,८७,१४७), गुजरात (४,६२,८१९), केरळ (३,९२,४०९), महाराष्ट्र (३,५९,४९३) आणि मध्यप्रदेश(३,५५,२५९) या राज्यांनी अतिरिक्त मात्रांचा वापर केला आहे.

देशभरातील आकडेवारी

१ मे ते १३ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात ४१ लाख ११ हजार ५१६ अधिकच्या मात्रांचा वापर केला गेला, तर २ लाख ४९ हजार ६४८ मात्रा वाया गेल्या आहेत.

अतिरिक्त उपलब्धता

एका लसकुपीत १० मात्रा (म्हणजे सहा मिलिलीटर लस) असतात. एक मात्रा ०.५ मिलिलीटरची असल्यामुळे फक्त पाच मिलिलीटर लशीचा वापर होतो. उर्वरित एक मिलिलीटरमध्ये आणखी दोन मात्रा उपलब्ध होतात. म्हणजेच एका कुपीत असलेल्या ११ ते १२ लसमात्रांचा महाराष्ट्राने पुरेपूर वापर केला. त्यामुळे केंद्राने दिलेल्या लसमात्रांमधून ३ लाख ५९ हजार ४९३ अतिरिक्त मात्रांचा उपयोग महाराष्ट्राने केला.

मात्रा वाया घालवणारी राज्ये

लशीची कुपी उघडल्यावर तिचा वापर वेळेत न केल्यास उरलेल्या मात्रा वाया जातात. आठ राज्यांनी २,४९,६४८ मात्रा वाया घालवल्या आहेत. यात सर्वाधिक १,२६,७४३ मात्रा बिहारमध्ये वाया गेल्या आहेत. यानंतर मात्रा वाया घालवणाऱ्या राज्यांमध्ये जम्मू काश्मीर (३२,६८०), त्रिपुरा (२७,५५२), दिल्ली(१९,९८९), पंजाब (१३,६१३), उत्तर प्रदेश (१३,२०७), मणिपूर (१२,३४६), मेघालय (३५१८) यांचा समावेश आहे.

योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनातून दहा मात्रा असलेल्या कुपीतून ११ मात्रा, तर काही वेळा १२ मात्रा उपयोगात आणणे शक्य आहे. यासाठी योग्य नियोजनही आवश्यक आहे. महाराष्ट्राने ते साध्य केलेकेंद्र सरकारने उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजे तीन कोटी ४४ लाख ६१ हजार ५५० लसमात्रा वितरित केल्या आहेत..      – डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, आरोग्य विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona vaccine shortage maharashtra akp

ताज्या बातम्या