मुंबई : करोनामुळे ठप्प झालेली घरांची विक्री आता जोर धरू लागली आहे. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे घरविक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा घरविक्री ३२ टक्क्यांनी वाढल्याचे जोन्स लँग लासेले या संशोधन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. देशभरात विक्री झालेल्या घरांपैकी २९ टक्के  घरे मुंबईत विकली गेली आहेत. या काळात नव्याने १२ हजार ६५४ घरांची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्वेक्षणानुसार, गेल्या तिमाहीत (एप्रिल-मे-जून) मुंबईत तीन हजार ५२७ घरांची विक्री झाली होती. यंदाच्या तिमाहीत चार हजार १३५ घरांची विक्री झाली. मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकांकडे झालेल्या नोंदीनुसार, मुंबईत ऑगस्ट महिन्यात दोन हजार ६४२ घरांची तर सप्टेंबरच्या पहिल्या २० दिवसांत दोन हजार ७१७ घरांची विक्री झाली. मुद्रांक शुल्कात झालेल्या कपातीचा हा परिणाम असला तरी येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या तिमाहीत पुण्यात फक्त ८५१ घरांची विक्री झाली होती. यंदाच्या तिमाहीत त्यात वाढ होत १३४४ घरे विकली गेली. देशभरात पहिल्या तिमाहीपेक्षा यंदाच्या तिमाहीत घरांची विक्री होण्याचा वेग वाढला आहे. देशभरात विकल्या गेलेल्या १४ हजार ४१५ घरांपैकी २९ टक्के  घरे एकट्या मुंबईत विकली गेल्याचे या आकडेवारीवरून दिसते. या खालोखाल दिल्लीचा वाटा २२ टक्के  इतका आहे.

करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ग्राहक घरखरेदीकडे वळल्याचे दिसून येत असल्याचे मत जोन्स लँग लासेलेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी म्हटले आहे. पुढील वर्षभरात त्यात आणखी वाढ होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. विकासकांनी घरखरेदीसाठी काही आकर्षक योजना पुढे केल्याचाही परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विकासकांपुढे असलेली रोकडटंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. रखडलेले तसेच अर्धवट असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर विकासकांनी भर दिल्याचे आढळून येत असून त्यामुळे नव्याने घरे उपलब्ध होण्याची संख्याही रोडावली आहे. प्रामुख्याने एक कोटी रुपये किमतीची घरे उपलब्ध करून देण्यावरच विकासकांचा भर असल्याचे आढळून येत आहे. परवडणारी व छोटी घरे बांधण्याचाच प्रयत्न असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आल्याचे नायर यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection room sell state government stamp duty down akp
First published on: 02-10-2020 at 00:01 IST