|| प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपन्या बंद झाल्याने कर ऑनलाइनद्वारे भरण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई : चालू आर्थिक वर्षांमध्ये निश्चित केलेले उद्दीष्टय़ गाठण्यासाठी, तसेच करोना विषाणुच्या बाधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर येणारा खर्च भागविण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. एकीकडे आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी करोना निर्मूलनासाठी झटत असताना दुसरीकडे करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराच्या वसुलीचा धडाका लावला होता. मात्र राज्य सरकारने कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे मालमत्ता कर वसुलीला ग्रहण लागण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तोडगा म्हणून पालिकेने नागरिकांना मालमत्ता कर ऑनलाईनद्वारे भरण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना चालू आर्थिक वर्षांमध्ये पालिकेच्या महसुलात झालेली घसरण विषद केली होती. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या अखेरच्या महिन्यात मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. कर थकविणाऱ्यांच्या टीव्ही, फ्रिज, फर्निचर, वाहने जप्त करुन कर वसुलीचा सपाटा पालिकेने लावला होता. चालू आर्थिक वर्षांमध्ये ५८४४.९४ कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्टय़ निश्चित करण्यात आले होते. मात्र आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना निम्माच कर वसूल झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे करनिर्धारण आणि संकलन विभागाने उर्वरित काळात मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले होते.

१ ते २० मार्च २०१९ या काळात ३०१ कोटी रुपये कर वसूल झाला होता. मात्र १ ते २० मार्च २०२० या काळात ५०२ कोटी रुपये कर वसूल करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे. चालू आर्थिक वर्षांत ५८४४.९४ कोटी रुपयांपैकी ३९३५ कोटी रुपये कर वसूल झाला आहे.

पालिकेचा आर्थिक डोलारा डळमळू नये यासाठी थकीत मालमत्ता कराची वसुली होणे गरजेचे आहे. त्यातच आता करोनाच्या निर्मूलनासाठी मोठा खर्च पालिकेला उचलावा लागत आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत मोठय़ा प्रमाणावर मालमत्ता कर वसूल करण्याचा करनिर्धारण आणि संकलन विभागाचा मानस आहे.

थकीत कर वसूल करणे अवघड

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मार्च महिना महत्त्वाचा समजला जातो. मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणार कर भरणा होत असतो. मात्र करोना विषाणुने थैमान घातले आहे. असे असतानाही करनिर्धारण आणि संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराच्या वसुलीचा धडाका लावला होता. परंतु करोनाचा तिसरा टप्पा सुरू होण्याच्या बेतात आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना सुट्टय़ा देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार कंपन्यांकडून थकीत कर वसूल करणे अवघड बनले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus property tax recovery in bmc akp
First published on: 26-03-2020 at 00:35 IST