लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मार्च महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली देवस्थानांची दारे सोमवारपासून खुली झाली. दिवाळीचे मंगलमय वातावरण असल्याकारणाने पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापनांनी नियमावली व व्यवस्था केली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर सोमवारी उघडताच सकाळी ६ ते ८ या वेळेत ८५० भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतल्याची माहिती महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी दिली. या दिवशी पाडवा आणि भाऊबीज असल्याने भाविकांची संख्या कमी होती. मात्र, यापुढे ही संख्या वाढत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पायरीपासून ते गाभाऱ्यापर्यंत एकावेळी फक्त तीसच भाविकांना उपस्थित राहता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शन घ्यायचे असल्यास क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या उपयोजनावर (अ‍ॅप) नोंदणी के ल्यास भाविकांना हा क्यूआर कोड मिळतो. एका तासात शंभर ते दीडशे जणांना, याप्रमाणे दिवसभरात १५०० भाविकांना प्रवेश दिला जात आहे. दुपारी १२ ते १ आणि संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत कोणालाही प्रवेश न देता फक्त गुरुजी पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात. र्निजतुकीकरण के लेले पाकीटबंद लाडूच प्रसाद म्हणून दिले जात आहेत. ‘या पद्धतीमुळे भाविकांचा वेळ वाचत असून ते समाधान व्यक्त करत आहेत. गुरुवापर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे’, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

‘इतक्या महिन्यांनी मंदिर उघडल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे. मूर्तीपूजेला परवानगी आहे, मात्र प्रार्थना के ली जात नाही. शरीराचे तापमान तपासून आणि हातांना सॅनिटायजर लावूनच प्रवेश दिला जात आहे. जैन भाविकांच्या तोंडावर एरव्हीही सातपदरी मुखपट्टी असतेच’, अशी माहिती चेंबूरच्या ‘पाश्र्वतिलक श्वेतांबर मूर्तीपूजक जैन न्यासा’चे विश्वस्त के तन मेहता यांनी दिली.

‘गेल्या दोन दिवसांत माहीम चर्चमध्ये ५०० भाविकांनी दर्शन घेतले. येथे अंतरनियम पाळून १५६ जणांसाठी बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्मीयांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बुधवार आणि रविवारची प्रार्थना चित्रित करून यूटय़ूब वाहिनीवर दाखवली जाणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांनाही प्रार्थनेत सामील होता येईल. बुधवारपासून भाविकांची संख्या वाढेल. गर्दी आवरण्यासाठी स्वयंसेवक असतील’, अशी माहिती फादर लॅन्सी पिंटो यांनी दिली.