मुंबईतील ८० टक्के मृत्यू ५० वर्षांवरील रुग्णांचे

मुंबई : सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक मृत्यू झाले असले तरी त्यापैकी १७९६ मृत्यू जुलै महिन्यात झालेले आहेत.

तर सप्टेंबरमध्ये मात्र रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढलेली असताना मृतांची संख्या १२७९ आहे. सप्टेंबरनंतर मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली. गेल्या महिन्याभरात दररोज दोन हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होते आहे. ऑगस्टच्या तुलनेत ८० टक्के रुग्ण सप्टेंबर महिन्यात वाढले आहेत. मात्र त्यापैकी बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. मात्र गंभीर असलेल्या रुग्णांमध्येही मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जुलै महिन्यात ५.७ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला मृत्युदर सप्टेंबर महिन्यात ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात पालिकेला यश आले आहे.

दरम्यान, ९ ऑक्टोबपर्यंत ९३४० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ७९२१ म्हणजेच ८४ टक्के मृतांचे वय ५० वर्षांवरील होते, असे आढळून आले आहे. ५० वर्षांवरील या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब असे दीर्घकालीन आजार असतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.