पशुसंवर्धन विभागाच्या जाहिरातीमधील अटींकडे दुर्लक्ष

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या जाहिरातीतील राजकीय बांधिलकी नसण्याच्या अटींकडे दुर्लक्ष करीत अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही ‘पशुकल्याण स्वयंसेवक’ म्हणून अर्ज केल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

पशुसंवर्धन विभागाने  जाहिरातीत ‘धार्मिक आधारावर पशुकल्याण कार्यात भाग घेणाऱ्यांनी’ पशुकल्याण अधिकाऱ्यांच्या विनावेतन ‘मानद’ पदासाठी अर्ज करावा असे म्हटले होते.  गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या गोमांस बंदीच्या अंमलबजावणीवर हे लोक देखरेख ठेवतील असे सांगतानाच, अर्जदार कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसावे, असे त्यात म्हटले होते. या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून राज्यभरातून २३८८ अर्ज आले असून, ‘अर्जदाराचा प्रामाणिकपणा व निष्ठा यांची हमी  घेणारे’ आणि ‘त्यांच्या वर्तणुकीची हमी घेणारे’ पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा उपायुक्तांचे शिफारस पत्र प्रत्येक अर्जाला जोडले आहे.

निकष मोडले

अर्जदारांची राजकीय किंवा धार्मिक बांधीलकी नसावी, असा निकष असतानाही आपण विहिंप, बजरंग दल, राम सेना, हिंदू सेना, शिवसेना, दुर्गावाहिनी, अ.भा. विद्यार्थी परिषद आणि रा.स्व. संघ या संघटनांचे आपण सदस्य असल्याचे मान्य करणाऱ्या अनेकांनी अर्ज केले आहेत. ६० टक्क्य़ांहून अधिक अर्जदारांनी ओळख ‘गोरक्षक’ म्हणून दिली असून, गोरक्षण समित्यांशी संलग्न असल्याचे सांगितले आहे.