scorecardresearch

बोगस मजूरप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा

मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूरह्ण असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अखेर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप आचार्य, निशांत सरवणकर

मुंबई : मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूरह्ण असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अखेर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर हे बोगस ‘श्रीमंत’ मजूर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. दरेकर यांच्यावर फसवणूक, खोटी माहिती देणे, विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर करणे आदींप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरेकर हे गेली २० वर्षे मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेवर निवडून येत होते. मात्र दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. ही तक्रार विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी काहीही कारवाई झाली नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर चक्रे वेगाने फिरू लागली. या बातमीची दखल घेऊन विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांच्यावर नोटीस बजावली. आपण मजूर कसे आहात हे सिद्ध करण्यास सांगितले. मात्र दरेकर यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत.

अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यानंतर ‘आप’च्या धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून विभागीय सहनिबंधकांचाही जबाब नोंदवला. मात्र तरीही गुन्हा दाखल होत नव्हता. ‘आप’नेही दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनाही स्मरणपत्रे पाठविली. अखेर मंगळवारी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

मजूर असल्याचे भासवून दरेकर मुंबै बँकेवर संचालक व अध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. या काळात मुंबई बँकेत कोटय़वधी रुपयांचे घोटाळे झाल्याच्या अनेक तक्रारी असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा १९६० च्या कलम ८९ अ अंतर्गत चौकशी करून अहवालही दिलेले आहेत. २०१५ पासून नाबार्डच्या काही अहवालात मुंबै बँकेतील अनियमितता व घोटाळय़ांवर ठपका ठेवलेला आहे. २०१३ साली सहकार विभागाने ८९ अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबई बँकेची व ठेवीदारांची संगनमताने फसवणूक केल्याचे, विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद करत कारवाईची शिफारस केली होती. मात्र या अहवालावर सहकार विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. २०२० मध्ये सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे यांनी ८९अ खाली चौकशी करून अहवाल सादर केला. तसेच सहकार कायदा कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश जारी केले. यामुळे नेमके कोणी घोटाळे केले याची जबाबदारी निश्चित होणार आहे. मुंबै बँकेतील कथित गैरव्यवहाराबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानेही गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक नीलेश नाईक यांनी मुंबै बँकेचा चाचणी लेखापरीक्षण अहवाल तयार करून सहकार विभागाला सादर केला आहे. या अहवालाचा आढावा घेतल्यास २०१५ ते २०२० या काळात मुंबै बँकेत सुमारे दोन हजार कोटींचा आर्थिक घोटाळा व अनियमितता झाल्याचे दिसून येत असून याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाने करावी, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे.

गुन्हा दाखल झाल्याने विधान परिषदेत गोंधळ

 मुंबई:  ‘मजूर’ असल्याचे भासवून वर्षांनुवर्षे मुंबै बँकेची निवडणूक लढवून  हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात   दाखल  झालेल्या गुन्ह्याचे  पडसाद आज विधान परिषदेत उमटले.  दरेकर यांच्या विरोधातील गुन्हा मागे घ्यावा म्हणून भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. सत्ताधारी सदस्यांनी दरेकर यांच्या अटकेची मागणी केली.  या गोंधळात विधान परिषदेचे कामकाज दिवसभराकरिता तहकूब करण्यात आले. सभागृहाचे  कामकाज सुरू होताच, भाजपचे जेष्ठ सदस्य भाई गिरकर यांनी दरेकर यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा मुद्दा  उपस्थित केला. मुंबै बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे मजूर संस्थेतून निवडून आलेले नाहीत असे सांगत आघाडी सरकारचे सूडाचे राजकारण सुरू आहे असा आरोप गिरकर यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crime against praveen darekar bogus labor case ysh