भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला येऊन झेन गाडीला धडकल्याने झेन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मानखुर्द येथे बुधवारी दुपारी घडली. मृत झेन चालकाचे नाव असून स्कॉर्पिओ चालकाला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. स्कॉर्पिओमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते, परंतु, स्कॉर्पिओतील एअरबॅगमुळे तिघांचाही जीव वाचला.

मानखुर्दमध्ये राहणारे बबलू यादव (२८ वर्षे) त्यांची पत्नी आणि मुलीसह स्कॉर्पिओ गाडीतून वाशीहून मुंबईच्या दिशेने येत होते. शीव-पनवेल मार्गावरील मानखुर्द रेल्वे उड्डाणपूल येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आली असता यादव यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजक ओलांडून पलिकडल्या बाजूला गेली. त्याचवेळी मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या झेन गाडीला स्कॉर्पिओने जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की झेनचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. तर गाडीचालक विजय गहलोत (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. गोवंडी पोलिसांनी यादव यांना ताब्यात घेऊन निष्काळजीपणे वाहन चालविण्याच्या गुन्ह्य़ात त्यांना अटक केली. गाडीवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून पलिकडच्या बाजूला जाऊन जीवघेणा अपघात होण्याची ही पंधरवडय़ातील तिसरी घटना आहे.

एअरबॅगमुळे कुटुंब वाचले

मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर येथे राहणारे यादव कुटुंबीयांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या. स्कॉर्पिओ गाडीचा पुढच्या भागाला नुकसान झाले असले तरी झेन गाडीशी आघात झाल्याक्षणीच एअरबॅग बाहेर आल्याने यादव यांची पत्नी आणि मुलगी यांना गंभीर जखमा झाल्या नाहीत.उ

२४ तासांत ५.६० लाखांचा ऐवज जप्त

तब्बल साडेपाच लाख रुपये किंमतीचे सोने चोरुन पळून गेलेल्या ‘लिव्ह इन पार्टनर’ला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पकडले. सुनील तिबडेवाल (४४ वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे.

ग्रँटरोड परिसरात राहणारी रेणू सिंग (३५) बारमध्ये काम करते. फर्निचरची कामे करणारा सुनील तिबडेवाल याची तीन वर्षांपूर्वी तिच्याशी ओळख झाली. तेव्हापासून तिबडेवाल रेणूच्या घरी ‘लिव्ह इन पार्टनर’ म्हणून राहत होता. पण, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याचे नुकसान झाले, असे तिबडेवाल तिला सांगत असे. मागील आठवडय़ात रेणू आपल्या नातेवाईकाकडे गेली असता, तिबडेवाल याने तिचे ५ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. रेणू घरी आली असता, तिला आपले दागिने जागेवर नसल्याचे कळले. तिने २३ जुलैला डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तिबडेवाल याचा माग काढण्यास सुरुवात केली असता, तो मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली.

डॉ. दा. भ. मार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास कक्षातील पोलीस उपनिरीक्षक नितीन लवांदे, हवालदार तावडे, मुजावर, वऱ्हाडी, बोरसे यांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत तिबडेवालला पकडले. त्याच्याकडून रेणूचे ५.६० लाख रुपयांचे दागिने आणि ४७०० रुपये रोख हस्तगत करण्यात आले.