अनिश पाटील
मुंबई: दखलपात्र प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न केल्यास संबंधित पोलिसांवरच आता भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे. त्यामुळे मोबाइल, दागिने चोरी प्रकरणांमध्येही दखलपात्र गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे एकाच महिन्यात मुंबईतील गुन्ह्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. फक्त मार्च महिन्यात मुंबईत आठ हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली.
मोबाइल, दागिने चोरी प्रकरणांमध्ये यापूर्वी वस्तू गहाळ झाल्याचे प्रमाणपत्र दिले जायचे. पण पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दखलपात्र प्रकरणामध्ये गुन्हे दाखल न केल्यास संबंधित पोलिसांवर १६६(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईतील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सर्व ९९ पोलीस ठाण्यांमध्ये अनुक्रमे तीन हजार ८७८ व चार हजार ६०२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोबाइल व दागिने चोरीप्रकरणीही वस्तू गहाळ झाल्याची नोंद न करता थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर मार्च महिन्यात(२७ मार्चपर्यंत) ८०२८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात चार हजार ९२० गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत वाढ झालेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश गुन्हे मोबाइल व दागिने चोरीचे तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांविरोधात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मोबाइल अथवा दागिने चोरीची तक्रार घेऊन नागरिक आल्यास अनेक अंमलदार वस्तू गहाळ झाल्याची नोंद करतात. ही चुकीची कार्यपद्धती आहे. मोबाइल अथवा दागिने चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, असे आदेश पांडे यांनी पोलिसांना दिले होते. तसे न केल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी पांडे यांनी दिले. विशेष म्हणजे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मोबाइल चोरीमध्ये सीमकार्ड मिळवण्यासाठी तक्रारदार व्यक्तीला पोलीस तक्रारीची प्रत आवश्यक असते. त्यासाठी यापूर्वी फक्त मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार घेतली जायची. त्यामुळे तक्रारदाराला सीमकार्ड मिळायचे. पण अशा प्रकरणांमध्ये पुढे तपास व्हायचा नाही, ही बाब
नागरिकांच्या दृष्टीने चुकीची असल्याच्या भावनेने पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘पोलिसांवर ताण वाढणार नाही’
पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असताना आता या वाढलेल्या जबाबदारीचा ताण पडेल, असे मत काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईत ४६ हजार २१२ मंजुर पदे आहेत, पण सध्या केवळ ३७ हजार ४६५ पोलीस कार्यरत आहेत. पण प्रत्येक पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व हवालदार पदावर कार्यरत पाच पोलिसांना छोटय़ा गुन्ह्यांमध्ये तपास करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांकडे यादी मागवण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या गुन्ह्यांचा ताण मनुष्यबळावर पडणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2022 रोजी प्रकाशित
दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यास पोलिसांवरच गुन्हा!; मोबाइल, दागिने चोरी प्रकरणेही दखलपात्र केल्याने गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ
दखलपात्र प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न केल्यास संबंधित पोलिसांवरच आता भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे.
Written by अनिश पाटील

First published on: 05-04-2022 at 00:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against mumbai police notifiable crime not filed mobile jewelery theft cases have also been reported doubling crime rate amy