मुंबई : शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे.  दोन्ही मेळाव्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर कोणत्या मेळाव्याला अधिक गर्दी होणार याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’च्या मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दीड ते दोन लाख समर्थक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे याकरिता दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने कोणताच निर्णय न घेतल्याने शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वीच शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीएचे मैदान उपलब्ध झाले होते.  राज्यातील विविध शहरांतून, तसेच ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिकांना मेळाव्यासाठी मुंबईत आणण्याच्या हालचाली दोन्ही गटांनी सुरू केल्या आहेत.

 मेळाव्याला दीड ते दोन लाख समर्थक येतील, असा दावा शिंदे गट करीत   आहे. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ४० हजार एवढी आहे. त्या तुलनेत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानाची क्षमता अधिक आहे. एमएमआरडीए मैदानातील मेळाव्याला मोठी गर्दी होईल, असा दावा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.