संस्कृत भाषेचे मर्मज्ञ जाणकार आणि राष्ट्रभाषा हिंदीचे सक्रिय प्रचारक, लोकप्रिय अध्यापक तसेच मुंबई हिंदी विद्यापीठाचे मानद कुलपती डॉ. मोरेश्वर दिनकर पराडकर यांचे आज पहाटे बोरिवली येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
प्रख्यात प्राचीन मराठी कवी मोरोपंत यांच्या वंशात जन्मलेल्या ‘मो.दिं.’नी आपल्या प्रतिभेने आणि अभ्यासाने घराण्याची परंपरा एका वेगळ्याच उंचीवर नेली. बीएला मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात ते पहिले आले होते. संपूर्ण देशाला जोडणाऱ्या संस्कृत आणि हिंदी या दोन्ही भाषांवर त्यांचे सारखेच प्रेम आणि प्रभुत्वही होते. हिंदीचा प्रचार करणाऱ्या ‘राष्ट्रभाषा हिंदी प्रचारसभे’चे काम ते अर्धशतकाहून अधिक काळ करीत होते. मुंबई हिंदी विद्यापीठाशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. या विद्यापीठाचे ते तब्बल २५ वर्षे मानद कुलपती होते. संस्कृतचाही त्यांचा अभ्यास गाढा होता. संस्कृतमधील सर्व प्रकारच्या साहित्याचा परिचय करून देणारी ५२ भागांची आकाशवाणीवरील त्यांची मालिका अतिशय गाजली होती.
तसेच दूरदर्शनवरील ‘अमतवेल’ ही मालिकासुद्धा रसिक आणि तज्ज्ञांच्या पसंतीस उतरली होती. ‘रघुवंश’ या अभिजात संस्कृत काव्याचे रसाळ विवेचन त्यांनी केले आहे. यासाठी सलग ११ वर्षे ते काम करीत होते.
मो. दि. एक लोकप्रिय शिक्षक होते. रुइया, सोमैय्या महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. तसेच पालघरचे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व डोंबिवलीचे पेंढारकर महाविद्यालय येथे त्यांनी प्राचार्यपदही भूषविले होते.