जागा रिकामी करण्यासाठी अखेरचा उपाय

मेट्रो – ३ प्रकल्पाच्या कामात अडसर ठरलेल्या मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांच्या कार्यालयांची जागा रिकामी करण्याकरिता थेट पाणी आणि वीजच कापण्यात आली आहे. याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी या पक्षांना बसला आहे.

मंत्रालयासमोरील जागेत आठ राजकीय पक्ष आणि २९ सरकारी कार्यालये होती. या जागेत मेट्रोचे स्थानक बांधण्यात येणार असून, ही जागा रिकामी करण्याकरिता राजकीय पक्षांना ऑक्टोबर २०१५ पासून सातत्याने नोटिसा बजावण्यात येत आहेत. राजकीय पक्षांना मुंबई मेट्रोच्या वतीने बेलार्ड पिअर येथे पर्यायी जागाही देण्यात येणार आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्याने ही जागा प्रकल्पासाठी आवश्यक होती. राजकीय पक्ष जागा रिकामी करीत नसल्याने अखेर शनिवारी रात्री इंगा दाखविण्यात आला. राजकीय पक्षांच्या कार्यालयांची वीज आणि पाणी तोडण्यात आले. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेते संतप्त झाले होते.

पर्यायी जागा तयार झाली नसताना पाणी आणि वीज तोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी व्यक्त केली. २४ मार्चला आम्ही मुंबई मेट्रोला सारे आराखडे सादर केले, पण त्यांनी अद्याप कामच सुरू केले नसल्याचे तटकरे यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने अन्य जागेची निवड केली असून त्याबाबत करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मेट्रोच्या सूत्राकडून सांगण्यात आले. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता वीज आणि पाणी तोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याची भावना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली.

पर्यायी जागा तयार होईपर्यंत वीज आणि पाण्याची जोडणी करण्याची केलेली मागणी सरकारने मान्य केली नाही. मात्र ‘मॅट’च्या कार्यालयाची वीज जोडण्यात आल्याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले. या संदर्भात राष्ट्रवादीकडून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी करण्यात आली आहे.

शिवसेना आणि समाजवादी पक्षाने येत्या दोन दिवसांत जागा रिकामी करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप काही प्रतिसाद देण्यात आला नाही, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.