तुर्भे येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुधीर तुंगार यांनी आपल्या दबंगगिरीचे दर्शन घडविले. त्यांच्या जागी राज्य शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले अपर आयुक्त डॉ. सुभाष माने यांना त्यांनी पदभार देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या दोघांत शाब्दिक चकमक झडल्याने एकाच मुख्यालयात दोन उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ तळ ठोकला होता. तुंगार यांना काही संचालकांचा पाठिंबा असून माने यांची नियुक्ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाने झाली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीच्या सचिव पदावरुन सध्या चांगलाच कलगी-तुरा रंगला आहे. विद्यमान सचिव तुंगार हे गेली अडीच वर्षे या पदावर आहेत. त्यांच्याकडे हा पदभार अतिरिक्त आहे. ते अपर निबंधक असून हे पद अपर आयुक्त पदासाठी राखीव आहे. समितीने तसा ठराव तीन वर्षांपूर्वी केला होता पण माने आल्यानंतर हा ठराव रद्द करण्याचा दुसरा ठरावही मंजूर केला आहे. या नवीन ठरावामुळे तुंगार पदाला चिकटून आहेत. आता त्या दर्जाचा अधिकारी मिळाल्याने सप्टेंबरमध्ये त्यांची नियुक्ती एपीएमसीच्या सचिव पदी झाली होती. त्यावेळीही माने यांना तुंगार यांनी पदभार दिला नाही. त्यामुळे माने तीन महिन्याच्या रजेवर गेले. ते शुक्रवारी पुन्हा रजू झाले. त्यावेळी तुंगार यांनी त्यांना पदभार देण्यास स्पष्ट नकार दिला. माने हे तुंगार यांना पदानेही वरिष्ठ आहेत.
तुंगार-माने वादामागे एपीएमसीतील राजकारण दडलेले आहे. एपीएमसीच्या कांदा बाजाराची पुर्नबांधणी प्रस्ताव, तसेच अनधिकृत बाजारासाठी उच्च अधिकाऱ्याची कृपादृष्टी संचालकांना हवी आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एपीएमसीतील गैरव्यवहारच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे तुंगार यांचे गेल्या काही महिन्यात संचालकाबरोबर साटेलोटे तयार झाले असून हे संबध कायम राहावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान माने यांनी सकाळी पदभार घेऊन तसे परिपत्रक कर्मचारी-अधिकाऱ्यांना काढले असून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक मंडळाने माने यांना हजर करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर या अन्यायाच्या विरोधात आपण लढणार असून तुंगार मला कनिष्ठ असल्याने त्यांना आदेश पाळणे आवश्यक असल्याचे माने यांनी सांगितले आहे. दरम्याने माने यांना  पालकमंत्री गणेश नाईक यांना भेटून आपल्यावरील दबंगगिरीची हकीगत सांगितली.