उद्यानाच्या जागेवरच मेट्रोची मार्गिका; दहिसरमधील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

दहिसरच्या पुलाखाली मोकळ्या जागेत म्हाडाच्या निधीतून साकारण्यात आलेले ‘दीनदयाळ नागरी उद्यान’ सुरू होऊन वर्ष होत नाही तोच दहिसर ते डीएन नगर या ‘मेट्रो २ अ’च्या मार्गिकेकरिता या उद्यानाचा बळी जाणार आहे. उद्यानाचा वापर करता येणार नसल्याने येथील रहिवाशी नाराजीचा सूर तर लावत आहेत. तसेच, दोन वर्षांपूर्वी या उद्यानाचे काम सुरू करताना येथून मेट्रोची मार्गिका जाणार असल्याचे नियोजनकर्त्यांच्या लक्षात आले नाही का, असा सवालही करत आहे.

दहिसर पूलाखालील मोकळी जागा वापरात नसल्याने तिची अक्षरश: कचराकुंडी झाली होती. त्या जागेचा वापर रहिवाशांना करता यावा यासाठी स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांच्या प्रयत्नाने ही जागा स्वच्छ करून म्हाडाच्या निधीतून तिचे दीनदयाळ नगरी उद्यानाच्या निमित्ताने सुशोभीकरण करण्यात आले. पालिका निवडणूकीचा मुहूर्त साधत २५ डिसेंबर, २०१६ रोजी हे उद्यान लोकार्पण करण्यात आले. उद्यानात अद्ययावत खेळणी लावण्यात आली आहे. या शिवाय विविध प्रकारची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उद्यान परिसरात येऊ लागले. मात्र दहिसर पूलाजवळून जाणाऱ्या ‘मेट्रो २ ए’च्या मार्गिकेमुळे उद्यानातील जॉगर्स पार्क व चिल्ड्रेन पार्क बाधित होणार आहे. उद्यानातील काही भाग खणण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या उद्यानाची अवघ्या वर्षभरातच वाताहात होणार आहे. या शिवाय स्थानिक रहिवाशांना त्यापासून मुकावे लागणार आहे ते वेगळे.

पूलाच्या बाजूने मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशी सोसायटीतील नागरिकांना जाण्या-येण्यास रस्ता नव्हता. हा रस्ता उद्यानातून देण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. मेट्रोचे काम झाल्यानंतर उद्यान पूर्ववत करण्यात येईल, असेही एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात येत आहे. तोपर्यंत आम्ही जायचे कुठे असा रहिवाशांचा सवाल आहे.

उद्यानातून मेट्रोचा मार्ग जाणार होता, तर लाखों रुपये खर्च करून जनतेच्या पैशांचा अपव्यय का करण्यात आला, असा सवाल स्थानिक नागरिक राजेश पंडया यांनी केला आहे. ‘गेले तीन महिने सुरु असलेल्या पावसामुळे येथे फक्त प्रभात फेरी व संध्याकाळी फेरफटका मारण्यास येणाऱ्यांची गर्दी असते. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. या उद्यानाच्या निमित्ताने आम्हाला मोठा आधार होता. कारण, दहिसरच्या रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांच्या गर्दीमुळे आम्हाला रस्त्यावरून फेरफटाका मारणे नकोसे होत होते. त्यात गेल्या वर्षी हे उद्यान झाल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला.  मात्र आता हेही मेट्रोच्या कामात तोडले जात असल्यामुळे आम्ही नेमके जायचे कुठे,’ असा सवाल विनाबेन पटेल यांनी केला.

उद्यानाचा काही भाग मेट्रोच्या कामासाठी देण्यात आला आहे. पूलाच्या बाजूने मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशी सोसायटीतील नागरिकांना जाण्या-येण्यास रस्ता नव्हता. हा रस्ता उद्यानातून देण्यात येणार आहे. हे काम तात्पुरते असून वर्षभरानंतर उद्यान एमएमआरडीएकडून पूर्ववत करण्यात येईल.   – मनिषा चौधरी, स्थानिक आमदार