एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ३० जूनपर्यंत नियमित बसेसच्या फेऱ्यांव्यतिरिक्त रोज १०० जादा बसेस सोडण्याचे जाहीर केले आहे.
कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या गाडय़ांच्या मुद्दय़ावरून सध्या वाद जोरात सुरू आहे. प्रवाशांचे प्रश्न कोणाच्या अखत्यारीत येतात, यावरून सुरू असलेल्या वादामुळे मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या ५८ विशेष गाडय़ांच्या व्यतिरिक्त अद्याप एकही विशेष गाडी सोडण्यात आलेली नाही. परिणामी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी एसटीच्या गाडय़ा आणि खासगी गाडय़ांकडे वळली आहे. मुंबई/ठाणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महामंडळाने मुंबई विभागातील १४ आगारातून जादा बसेस सोडल्या आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर, भांडुप, बोरिवली, भाइंदर, वसई, नालासोपारा, अर्नाळा, विरार, ठाणे, कल्याण, पनवेल आणि उरण येथून या बसेस सुटणार आहेत. या बसेसचे आरक्षण महामंडळाच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून महामंडळाच्या http://www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरही आरक्षण करता येईल, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे.