मुंबई : कलाकारांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास हा सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय असतो. एरव्ही अभिनयात शंभर टक्के पास असणारे कलाकार प्रत्यक्ष शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणातही तितकेच हुशार असतात का ?, याबद्दल कळत-नकळत अनेकदा चाहत्यांकडून चाचपणी होत असते. ‘डिस्कव्हरी प्लस’च्या ‘द सिक्रेट्स ऑफ कोहिनूर’ या डॉक्युसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी उत्सूक असलेल्या मनोज वाजपेयीलाही त्याच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बाकी शिक्षणाचे खरे नाही… पण इतिहासात कायमच रस वाटत आल्याचे त्याने सांगितले.
शाळा काय आणि महाविद्यालय काय… शिक्षण म्हणजे माझ्यासाठी फार अवघड कोडे होते, असे मनोज म्हणाला. कधी एकदा शिक्षण संपते आणि मी अभिनयाचे धडे गिरवतो, असे मला वाटत होते. त्यातल्या त्यात इतिहासात मला रस वाटायचा, कारण इतिहासातील तारखा वगळल्या, तर ती गोष्टच असते. मी कायम इतिहासाचा गोष्टीसारखाच अभ्यास केला. त्यामुळे ‘डिस्कव्हरी प्लस’वरचे ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’ , ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर’सारखे कार्यक्रम करताना मला स्वतःला खूप आनंद वाटतो, असे मनोजने सांगितले. चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये व्यस्त असलेल्या मनोज वाजपेयीने गेल्यावर्षी प्रसिध्द दिग्दर्शक नीरज पांडेची निर्मिती असलेल्या ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली – डिस्कव्हरी ऑफ सेन्च्युरी’ या शोमध्ये सूत्रधाराची भूमिका केली होती. आताही नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी ही जोडी ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिनूर’ या डॉक्युसीरिजच्या माध्यमातून ‘डिस्कव्हरी प्लस’ वर परतते आहे. या दोन्ही डॉक्युसीरिजचे दिग्दर्शन राघव जयरथ यांनी केले आहे. जगात सर्वाधिक चर्चिला गेलेला कोहिनूर हिरा, तो मिळवण्यासाठी झालेल्या लढाया आणि प्रत्यक्षात त्याचे आताचे वास्तव असा खूप मोठा ऐतिहासिक प्रवास या डॉक्युसीरिजमधून उलगडणार असून ४ ऑगस्टपासून ‘सिक्रेट्स ऑफ द कोहिूनर’चे प्रसारण ‘डिस्कव्हरी प्लस’वर करण्यात येणार आहे.
नीरज – मनोज जोडगोळी नीरज पांडेचे दिग्दर्शन आणि मनोज वाजपेयीचा अभिनय हा योग ‘स्पेशल २६’, ‘नाम शबाना’, ‘अय्यारे’ सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवला आहे. नीरज पांडेचे दिग्दर्शन असो वा निर्मिती मनोज वाजपेयीचा त्याच्या कलाकृतींमध्ये महत्त्वाचा सहभाग असतोच. नीरज पांडेबरोबर असलेल्या या मैत्रीबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला की, आमच्या दोघांचेही डोके कायम ठिकाणावर असते. आजूबाजूचे भान ठेऊन आम्ही कायम वावरत आलो आहोत. दिग्दर्शक वा निर्माता म्हणून ज्या पध्दतीच्या कलाकृती नीरज पांडेने केल्या आहेत, त्याचा भाग व्हायला कायम आवडते, असे त्याने स्पष्ट केले.