डेव्हिड हेडलीची जबानी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट लष्कर-ए-तोयबाने रचला होता. त्यासाठी त्यांनी एका दहशतवाद्याला भारतातही धाडले होते. परंतु कटाच्या अंमलबजावणीपूर्वीच या दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केल्याने लष्करच्या मनसुब्यांवर पाणी पडले, असा दावा अमेरिकन-पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने गुरुवारी विशेष न्यायालयासमोर केला. हा दहशतवादी नंतर पोलिसांच्या तावडीतून निसटल्याचे सांगताना त्याचे पुढे काय झाले हे माहीत नसल्याचा दावाही हेडलीने केला. बाळासाहेबांशिवाय अन्य कुणी लष्करचे लक्ष्य होते हे माहीत नसल्याचाही दावा त्याने केला.
२६/११च्या हल्ल्याप्रकरणी लष्करचा कथित दहशतवादी अबू जुंदाल याच्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर खटला चालवण्यात येत आहे. या खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार बनलेल्या हेडलीची ‘व्हिडीओ कॉन्फरिन्सग’द्वारे सध्या जुंदालचे वकील अब्दुल वहाब खान यांच्याकडून उलटतपासणी घेण्यात येत आहे. गुरुवारीही उलटतपासणीत त्याने लष्करने संधी मिळेल तेव्हा बाळासाहेबांची हत्या करण्याचा कट रचल्याचा खुलासा केला. परंतु त्याची अंमलबजावणी कशी करण्यात येणार होती, हे माहीत नसल्याचा दावा करताना एका दहशतवाद्याला बाळासाहेबांची हत्या करण्यासाठी धाडण्यात आले होते. मात्र त्याला अटक झाल्याने कट फसल्याचा दावाही हेडलीने केला.

अमेरिकन सरकारने एकदा आपल्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्च उचलला होता, असा खुलासा हेडली याने बुधवारी झालेल्या सुनावणीत केला होता. एवढेच नव्हे, तर लष्कर-ए-तोयबाने आपल्याला कधीच पैसे दिले नाहीत, तर आपणच २००६ पर्यंत त्यांना ७० लाख रुपयांहून (पाकिस्तानी) अधिकची देणगी दिल्याचा दावा हेडलीने केला.

..म्हणे निष्पापांची हत्या हे पापच!
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कधीच भेटलो नाही, पण कसाबचे छायाचित्र नंतर पाकिस्तानी वृत्तपत्र तसेच इंटरनेटवर पाहिले. तसेच कसाबच्या नावाआधी ‘रेहमतुल्ला अल्ला’ असे बोलण्यामागील कारणाबाबत त्याला खान यांनी विचारले. त्या वेळी एखादी व्यक्ती मरते तेव्हा तो चांगला आहे की वाईट हे न पाहता त्याच्यासाठी प्रार्थना करायची असते, त्याला माफ करायचे असते. तसेच कसाबला ओळखत नसल्याने तो चांगला होता की वाईट हे सांगू शकत नसल्याचेही तो म्हणाला. त्यावर कसाबने केलेले कृत्य चांगले की वाईट असा सवाल केल्यावर खून करणे हे वाईटच असते. निष्पापांचा खून करणे तर पापच असल्याचे हेडलीने म्हटले.