मुंबई : मध्य रेल्वेवरील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामकाजासाठी दौंड, दौंड यार्ड आणि दौंड ए केबिन व दौंड कॉर्ड लाइन येथे प्री-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्री - इंटरलॉकिंगचे काम २७ आणि २८ जुलै रोजी करण्यात येणार आहे. तसेच २९ जुलै रोजी सकाळी १०.४० ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत एकूण ८० तास काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. हेही वाचा : आषाढीनिमित्त ९.५३ लाख भाविकांचा एसटी प्रवास, एसटीच्या तिजोरीत २८.९२ कोटी रुपयांची भर दौंड येथे ब्लाॅकमुळे २८, २९, ३० आणि ३१ जुलैची नांदेड - पनवेल एक्स्प्रेस आणि २९, ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी पनवेल - नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ३०, ३१ जुलै रोजी सिकंदराबाद - एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी दादर - साईनगर शिर्डी एक्स्प्रेस आणि १ ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर, या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.