अभिनेता आदित्य पांचोली राहात असलेल्या वर्सोवा येथील ‘मॅगनेज् ओपज’ या इमारतीमधील जिन्यात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मयत व्यक्तीचे नाव दिपेश भट्ट (४६) असल्याचे वर्सोवा पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही सदनिका प्रवीण पारेख यांच्या मालकीची असून त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त या सदनिकेत शुक्रवारी रात्री पार्टी सुरू होती. पार्टीसाठी दीपेश आला होता. दीपेशचा मृतदेह इमारतीच्या जिन्यांत आढळून  आला. दिपेशच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तपासात आढळले असून पोलिसांनी या घटनेची ‘अपघाती मृत्यू’ म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीपेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाले ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.